बाळासाहेब जाधव , लातूरनवरात्र व बकरी ईद अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ नवरात्रोत्सव काळात शांतता व सुव्यवस्थेसाठी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सतर्कता बाळगण्यात आली आहे. दहा दिवसांच्या या महोत्सवासाठी पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी १५५८ पोलिसांचा फौजफाटा नेमला आहे. शिवाय, हिंगोली येथील सीआरपीची विशेष तुकडीही लातुरात बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान पोलिसांच्या वतीने बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्याच धर्तीवर नवरात्रोत्सव कालावधीत बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी लातूर जिल्ह्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवाची उत्सुकता भक्तांना असते. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहराच्या विविध ठिकाणी भक्तांनी देवीची स्थापना करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. गंजगोलाई येथील जगदंबा मंदिरात उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाय, दयानंद गेट, बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या जय अंबिका मंदिरासमोर भव्य असे मंडप उभारण्यात आले आहे. ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवाची तयारी जोरात आहे. निवडणुका असल्याने पोलिसांनी यावर्षी उत्सवात विशेष खबरदारी घेतली आहे. गावात शांततेत उत्सव पार पडावा, यासाठी ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनाही बंदोबस्तात सामावून घेण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.लातूर शहरात यावर्षी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवाय, दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. गंजगोलाई येथील जय जगदंबा मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवाच्या कालावधीत ९ दिवस विविध कार्यक्रमाचे मांदियाळी राहते़ तसेच काही ऐतिहासिक देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी वर्दळ दिसून येते़ स्थानिक पोलिसांच्या सहकार्यासाठी हिंगोली येथील एसआरपीची एक तुकडी लातुरात मागविण्यात आली आहे. शिवाय, ६०० पुरुष होमगार्ड व १०० महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी वाढविण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पोलिस दलावर सुरक्षेची जबाबदारी वाढली आहे. शिवाय, उत्सव कालावधीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस दल सतर्क झाले असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले. (प्रतिनिधी)
पोलिस बंदोबस्त वाढला
By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST