लातूर : लातूर जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी जिल्ह्यातील ‘अवैध प्रवासी वाहतूक प्रवाशांच्या जीवावर’ असे वृत्त प्रकाशित करताच पोलिस प्रशासन जागे झाले आहे. अवैध प्रवासी वाहतुकीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी १२६ वाहनांवर कारवाई केली असून, दंडही वसूल केला आहे.लातूर शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सकाळपासूनच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने गाठून त्यांच्यावर कारवाई केली. दिवसभर ही कारवाई मोहीम सुरूच होती. विशेष म्हणजे लातूर शहरातूनच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात येत होती. लातूर शहरातून किल्लारी, तांदुळजा, रेणापूर, अहमदपूर, चाकूर, निलंगा, अंबाजोगाई, पानगाव, मुरुड आदी मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. दहा प्रवाशांची आसन क्षमता असलेल्या वाहनांत वाहनचालक पोलिसांसमोरच पंधरा ते वीस प्रवासी वाहनांत बसवितात. इकडे आॅटोरिक्षा व दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक शाखेचे पोलिस मात्र अवैध प्रवासी वाहतुकीकडे डोळेझाक करताना दिसून येतात. सोमवारी लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे दिवसभरात १२६ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लातूर शहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, पाच नंबर चौक, नांदेड नाका आदी भागांत पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.(प्रतिनिधी) लातूर शहराबरोबर ग्रामीण भागातही वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे़ तसेच अवैध प्रवाशी वाहतूक, अवैध पार्किंग, ट्रीपल सीट वाहन चालविणे आदी बाबी दिवसेंदिवस वाढत आहेत़ कारवाई बरोबरच वाहनधारकांना त्यांची कर्तव्ये समजावून सांगण्यासाठी जनजागृती गरजेची आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२६ वाहनांवर पोलिसांची कारवाई
By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST