उमरी : मटका नावाच्या जुगाराने उमरी शहरात पाय रोवताच महाराष्ट्र राज्यासह इतर अनेक राज्यांचे लॉटरी तिकीट विक्री केंद्र अक्षरश: बंद पडले़ परिणामी शासनाचा महसूल तर बुडाला, पण अनेकजण बेरोजगार झाले़मटका हा जुगार फोफावण्यास या धंद्यातील नियोजन व प्रचार हा तेवढाच कारणीभूत आहे़ मुंबई-कल्याण या दोन नावाचा मटका दिवसभरात कल्याण व रात्री मुंबई हा सायंकाळनंतर सुरू होतो़ प्रत्येकाचे पत्ते, ओपन त्यानंतर क्लोज याप्रमाणे निकालाचे आकडे फोनवरून जाहीर होतात़ गावातील नेहमीचे एजंट पानटपरी तसेच कट्टयावर याची नोंदणी करीत असल्याने ते सहजपणे उपलब्ध होतात़ अगदी एक रुपयापासून मटका खेळला जातो़ त्यामुळे गरिबातला गरीब व्यक्ती या आकड्यावर आशेपोटी पैसे लावायला तयार होतो़ बांधकामावर दररोज मजुरी करणारे मजूर, वेटर, शेतकरी, एवढेच नाही तर काही विद्यार्थीसुद्धा या मटक्याच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र येथे दिसून येते़ गेल्या २० ते २५ वर्षांपासून शहरात मटका हा जुगार प्रचारात आाल़ सुरुवातीच्या काळात तर पानटपरीवर मटक्याचा निकाल पाटीवर लिहून ही पाटी लटकविली जात असे़ परंतु यावेळी महाराष्ट्र राज्य लॉटरी तसेच अरूणालच प्रदेश, आसाम, मिझोरम आदी राज्यांच्या तिकिटाची येथे दररोज विक्री होत असे़ महाराष्ट्र राज्य लॉटरीला त्यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक होते़ शहरात प्रत्येक पानटपरीवर या तिकिटाची विक्री होत असे़ मटका जुगार येताच हळूहळू लॉटरी तिकिटाची विक्री डबघाईला आली़ या व्यवसायातील अनेकजण बेरोजगार झाले़ यातून मिळणारे उत्पन्न हे शासन तिजोरीत जमा होते़ त्याचीही मोठी बुडवणूक झाली़ आता तर पूर्णपणे लॉटरीची जागा मटक्याने घेतली़ या धंद्यात अनेकजण चांगले मालदार बनले़ त्यांच्याकडे बेरोजगारांचा राबता वाढला़ राजकीय फायद्यासाठी मटकाचालकांना हळूहळू तथाकथित सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली़ मात्र जनता हे सर्व डोळसपणे पाहत असते़ त्यामुळे मटकाचालकांना वेळप्रसंगी त्यांची जागा दाखवून देण्याचे कामही जनतेकडून झाले़ असे असले तरी श्रमाविना मिळालेल्या पैशाच्या जोरावर शहरात गुंडगिरीचे प्रकार वाढल्याचे अलीकडे काही घटनांवरून स्पष्ट झाले़ हा अवैध धंदा उमरी शहरातून हद्दपार करण्याची मागणी जनतेतून होत आहे़ (वार्ताहर)
आकड्यांच्या खेळामुळे लॉटरी लागेना़़़
By admin | Updated: September 16, 2014 01:30 IST