औरंगाबाद : खाद्यतेलाच्या किमतीने शंभरीपार केलेली असतांनाच आता पेट्रोलची वाटचालही तीन अंकी आकड्याकडे सुरू झाली. औरंगाबादेत गुरुवारी पेट्रोल लिटरमागे २५ पैशाने वाढून ९२.०५ रुपये तर डिझेलचे भाव २९ पैशाने वाढून ८२.२९ रुपये प्रति लिटरपर्यत झाले.
डिझेलच्या भाववाढीने मालवाहतूक भाडे वाढून जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. हळूहळू महागाई सर्वसामान्याच्या भोवतीचा फास आवळत आहे. १ जानेवारी रोजी पेट्रोल ९१.५३ रुपये तर डिझेल ८१.७१ रुपये प्रति लिटर विक्री झाले होते. मागील वर्षी ५ सप्टेंबर रोजी पेट्रोल ९०.१६ रुपये तर डिझेल ८३.०१ रुपये प्रति लिटरपर्यंत जाऊन पोहचले होते.
वाहनधारक एक लिटर ऐवजी १०० रुपयाचे पेट्रोल खरेदी करतात. अनेक जण किती पेट्रोल मिळते त्याचे आकडेही बघत नाहीत, जणू काही वाहनधारकांनी आता महागाईला स्वीकारले आहे, असेच वाटत असल्याचे पेट्रोलपंप चालकांनी सांगितले.
चौकट
पेट्रोल व डिझेलच्या किमती एक्साइज ड्यूटी, डिलर कमिशन व अन्य स्थानिक कर जोडल्यानंतर दुप्पट किंमत होऊन जाते. केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी व राज्य सरकारचा व्हॅट रद्द केला तर पेट्रोल व डिझेलचा दर २७ रूपये प्रति लिटर राहतो. सरकारला महसुलाची मोठी रक्कम या इंधन विक्रीतून मिळते. भाववाढीने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. जीएसटीमध्ये पेट्रोल- डिझेलचा समावेश करा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.