संजय कुलकर्णी , जालनामराठवाड्यात एकेकाळी श्रीमंत समजल्या जाणाऱ्या जालना नगरपालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असून चालू आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्यांचा कालावधी असताना मालमत्ता कर वसुलीचे प्रमाण केवळ १५.४६ टक्के एवढेच आहे. त्यामुळे पालिकेसमोर वसुलीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.‘अ’ वर्गाची नगरपालिका असल्याने शहरात पालिकेने पुरेशा नागरी सुविधा द्याव्यात, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. परंतु वसुलीच नसल्याने सुविधा कशा द्यायच्या? असा युक्तीवाद नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केला जातो. २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी नगरपालिकेला मालमत्ता करापोटी २१ कोटी ६८ लाख ८३ हजार रुपये येणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या आठ महिन्यांच्या काळात ३१ जानेवारी २०१५ पर्यंत केवळ ३ कोटी ३५ लाख ३८ हजार रुपयांचीच वसुली झाली. तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात ४५ हजार मालमत्ताधारक आहेत. सध्या पालिकेकडून नवीन मालमत्ताधारकांचा शोध घेण्यासाठी सर्व्हेचे कामही सुरू आहे. वसुलीसाठी सदर बाजार, कादराबाद आणि जुना जालना असे तीन विभाग पालिकेने केलेले आहेत. यामध्ये सहा निरीक्षक आणि ३० वसुली लिपिकांची एकूण सहा पथके आहेत. या पथकांकडून सातत्याने वसुली मोहिम राबविण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात वसुली बोटांवर मोजण्याइतक्या मालमत्ता धारकांकडूनच होत आहे. पालिकेकडे मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी वसुली पथके जेव्हा जातात, त्यावेळी बहुतांश जणांकडून टाळाटाळ होते, असे या पथकातीलच काही जणांनी सांगितले. लोकांची मानसिकता नाही, असे बोलले जाते. सुविधा द्याव्यात, अशी नागरिकांची तर कराचा भरणा करावा अशी पालिकेची अपेक्षा आहे. परंतु सुविधा दिल्याच नाहीत, तर वसुलीविना दिल्या नाही, असा दावा करण्यास पालिकेचे अधिकारी तत्पर असतात, असेही चित्र दिसून येते.विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी जानेवारी महिन्यात जालन्याचा दौरा केला. यात त्यांनी नगरपालिकेला भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. त्यावेळी वसुलीचे प्रमाण केवळ १५.४६ टक्के असल्याचे ऐकून ते अचंबित झाले. एकेकाळी ‘जालना सोने का पालना’ अशी ओळख असलेल्या या शहराच्या वसुलीचे हे प्रमाण पाहून आयुक्त दांगट यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आयुक्तांच्या या दौऱ्यानंतरही वसुली मोहिमेला जोर आला नाही.याबाबत नगरपालिकेचे मालमत्ता कर विभागाचे अधिकारी के.के. आंधळे म्हणाले, पालिकेच्या वतीने सहा पथकांमार्फत शहरात वसुलीचे काम सुरू आहे. अधिक काळ थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर आम्ही जप्तीची कार्यवाही करत असून दंवडी पिटवून थकबाकी करण्याची मोहीमही आम्ही राबविणार आहोत, असे आंधळे यांनी सांगितले.
थकबाकी २१ कोटी; वसुली केवळ १५ %
By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST