लातूर : संत गाडगेबाबा मतीमंद मुलांच्या बालगृहात दोन वर्षांपूर्वी दाखल झालेला अनाथ नंदन गंभीर आजारी असून, उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे़ संत गाडगेबाबा मतीमंद बालगृहाचे अधीक्षकांनी नंदनवर सर्वोपचार रुग्णालयात प्राथमिक उपचार केले आहेत़ परंतु त्याचे लिव्हर खराब झाल्याने त्याला चांगल्या उपचाराची गरज आहे़ मात्र संत गाडगेबाबा मतीमंद बालगृहाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मदतीसाठी पदर पसरला आहे़ शासनाच्या बालकल्याण समितीकडून दोन वर्षांपूर्वी मतीमंद असलेल्या १२ वर्षीय नंदनचा प्रवेश लातूरच्या संत गाडगेबाबा मतीमंद मुलांच्या बालगृहात झाला आहे़ परंतु गेल्या काही दिवसांपासून तो आजारी आहे़ आठ दिवसांपूर्वी त्याला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ तेथे तपासण्या केल्यानंतर त्याचे लिव्हर खराब असल्याचे निदान झाले आहे़ पुढील उपचार या रुग्णालयात होत नाहीत़ मुंबई येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे़ या उपचारासाठी २० ते २५ लाख खर्च होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ एवढा खर्च करणे संत गाडगेबाबा मतीमंद बालगृहाला शक्य नाही़ संस्थेची आर्थिक स्थिती मोठा खर्च करण्याइतकी मजबुत नाही़ त्यामुळे नंदनच्या उपचारासाठी शासकीय, निमशासकीय संस्थांनी तसेच दानशुर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनाथ नंदनला हवी मदत...
By admin | Updated: October 29, 2014 00:45 IST