जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील १३६ उमेदवारांपैकी केवळ एकाच उमेदवाराने मंगळवारी निवडणूक रिंंगणातून माघार घेतली.पाच मतदार संघात एकूण १७७ उमेदवाऱ्यांनी २६८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४१ उमेदवारांचे अर्ज छाननीतून बाद झाले. त्यामुळे निवडणूक रिंंगणात १३६ उमेदवार उरले होते. त्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह छोटे पक्ष व संघटना पुरस्कृत व अपक्षांचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. त्यात जालना मतदारसंघातून डमी उमेदवारी दाखल केलेल्या संगीता कैलास गोरंट्याल यांनी आपला अर्ज मागे घेतला. बुधवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्या पार्श्वभूमीवरच पाचही मतदार संघात मतविभागणी करीता अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते.एकेक मत महत्त्वाचे आहे. हे ओळखूनच मातब्बर उमेदवार आपल्या वोटबँकेतील एका एका मताची फाटाफूट होऊ नये म्हणून अपक्षांची मनधरणी करत होते. त्यातील काहींसोबत अर्थपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात हालचाली सुरू होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)दरम्यान, निवडणूक रिंंगणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच अन्य घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेदवारी अर्ज कायम ठेवतील. परंतु छोट -छोट्या पक्षांचे उमेदवार कोणत्याही क्षणी बुधवारी रिंंगणातून माघार घेतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते.
१३६ पैकी केवळ एकाच उमेदवाराची माघार
By admin | Updated: October 1, 2014 00:38 IST