उस्मानाबाद : रोजगार हमी योजनेअंतर्गत सव्वापाच लाखांवर मजूर नोंदणी असली तरी आजघडीला अवघे सव्वापाच हजारांच्या आसपास मजूर कामावर कार्यरत आहेत. तर दुसरीकडे पावणेतीन लाखांवर मजुरांना जॉबकार्ड वितरित करण्यात आले आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मजूर संख्या वाढविण्याची गरज आहे.मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांची उपासमार होवू नये या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हाती घेतली. यातून मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कुटुंब नोंदणी व जॉबकार्ड वितरण करण्यात आले आहे. हा आकडा सध्या २ लाख १४ हजार ९०५ वर गेला आहे. तर सद्यस्थितीत नोंदणीकृत मजुरांची संख्याही ५ लाख ४४ हजार ३०० पर्यंत जावून ठेपली आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील पाच वर्षाेत ११ हजार ५५४ विविध कामे करण्यात आली आहेत. २०१२-१३ या वर्षात १ हजार २७२ कामे, २०१३-१४ मध्ये १ हजार ८९८, २०१४-१५ मध्ये ७ हजार ३६८ कामे पूर्ण केली. सदरील कालावधीत उस्मानाबाद जिल्ह राज्यात चौथ्या क्रमांकावर होता. दरम्यान, २०१५-१६ मध्ये १ हजार १६ कामे पूर्ण केली असून आता हा जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. जिल्ह्यात ८ हजार ४६५ पैकी ६ हजार १९१ विहीरीचे कामे पूर्ण झाली असून याची टक्केवारी ७३ इतकी असल्याचे रोहयोचे उपजिल्हाधिकारी तांबे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवघे पाच हजार मजूर हजर
By admin | Updated: August 20, 2015 00:45 IST