महेश पाळणे , लातूरभारतात लोकप्रिय असलेला क्रिकेट चाहत्यांचा लाडका खेळ आहे़ या खेळाची सेवा अनेक माध्यमातून माझ्या हातून होते, याचा सर्वस्वी आनंद आहे़ या क्रिकेटची अविरत सेवा हाच माझा ध्यास असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे निरीक्षक तथा विभागीय सचिव कमलेश ठक्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़ तीन वेळेस आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामन्याचे निरीक्षक राहिलेले कमलेश ठक्कर यांनी रविवारी ‘लोकमत’शी आपला सामना निरीक्षकाचा अनुभव व्यक्त केला़ यावेळी ते म्हणाले, सामना निरीक्षक म्हणून लातूरसारख्या शहरातून आपल्यासारख्या संघटकाला संधी मिळते, ही लातूरसाठी गौरवाची बाब आहे़ सामना यशस्वी करण्याची सर्वस्वी जबाबदारी निरीक्षकाची असते़ त्यामुळे हे काम अत्यंत आव्हानात्मक असते़ त्या दिवशीचा तो सामना यशस्वी करण्याची धडपड माझी असते़ विशेषत: सुरक्षेच्या गोष्टीवर अधिक भर दिला जातो़ पंच, प्रसार माध्यम, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी यासह खेळाडू व प्रशिक्षकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असते़ बीसीसीआयने दिलेल्या गाईड लाईनचे तंतोतंत पालन होते का नाही, हेही पाहणे यावेळी गरजेचे असते़ वैद्यकीय सेवा तसेच खेळाडू व प्रेक्षकांच्या संबंधित व्यवस्था सुरळीत आहे का हेही यावेळी पहावे लागते़ स्पर्धेदरम्यान दिवसभर मैदानावरील घडामोडींवर प्रत्येक वेळी लक्ष देणे बंधनकारक असते़ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के व बीसीसीआयने माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी त्यांचा आदर करतो़ भविष्यातही क्रिकेटच्या बाबतीत कसल्याही प्रकारची सेवा करण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले़मी निरीक्षक असलेल्या पहिल्या सामन्यात ग्वाल्हेर येथे भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविला होता़ या सामन्यात सचिन तेंडूलकरने २०० धावा केल्या होत्या़ इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने वेस्टइंडिजचा पराभव केला होता़ यातही विरेंद्र सेहवागने २१९ धावा ठोकल्या होत्या़ नुकत्याच झालेल्या व माझ्या तिसऱ्या निरीक्षक पदाच्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून निसटता पराभव स्विकारावा लागला़ याही सामन्यात रोहित शर्माने १५० धावा केल्या होत्या़ रोहित शर्मा या सामन्यात २०० धावा करु शकला असता व भारत मॅच जिंकला असता, तर तिन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंचे द्विशतक व भारताचा विजय हे हॅट्ट्रीकचे समिकरण झाले असते़ मी निरीक्षक असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारत हरल्याने दु:ख वाटले़ यासह जबाबदारीमुळे सामना पाहण्याचा आनंद मात्र निरीक्षक असल्याने घेता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले़
क्रिकेटची अविरत सेवा हाच ध्यास...
By admin | Updated: November 16, 2015 00:38 IST