जालना : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ४३.५२ टक्के पाऊस झाला असून यात घनसावंगी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ३२.५६ टक्के एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन ५८.६० तर परतूर तालुक्यात ५२.६९ टक्के पावसाची नोंद आहे.जिल्ह्याची वार्षिक सरासरी एकूण ६८८.२१ मि.मी. एवढी आहे. या तुलनेत आतापर्यंत २९९.५४ मि.मी. पाऊस झाला. २ सप्टेंबरपासून पावसाने उघडीप दिलेली आहे. तालुकानिहाय पावसाच्या नोंदीनुसार जालना तालुक्यात ३३१.७५ मि.मी., बदनापूर २६०.६०, भोकरदन ३८८.३८, जाफराबाद २७३.२०, परतूर ३९३.४०, मंठा २३१, अंबड २८८.२९ आणि घनसावंगी तालुक्यात २३०.४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वास्तविक ४ सप्टेंबरपर्यंच्या पावसाची अपेक्षित सरासरी ४९९.०१ मि.मी. एवढी होती. त्या तुलनेत आतापर्यंत २०० मि.मी. पाऊस कमी झाला आहे. पावसामुळे काही भागात पिकांना जीवदान मिळाले असले तरी काही भागात शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसानही झाले. मात्र पाऊस होणे सर्वांना अपेक्षित आहे. पावसामुळे काही टंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्या बंद झालेल्या आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ३१ आॅगस्ट रोजी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. याच पावसाने एकूण सरासरीची संख्या वाढविली. मात्र आणखी जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अंबड व बदनापूर तालुक्यात काही गावांमध्ये टँकर सुरू आहेत. तसेच घनसावंगी तालुक्यातही टँकरची गरज आहे.
घनसावंगी तालुक्यात केवळ ३२ टक्केच पाऊस
By admin | Updated: September 5, 2014 00:54 IST