जाफराबाद : तालुक्यताील बोरखेडी गायकी येथे शेती नावावर करून देण्याच्या वादातून भांडण होऊन दिग्रस (ता. देऊळगावराजा) राजेंद्र भिवसन बरांदे या इसमाचा खून करण्यात आला. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. कडूबाई राजेंद्र बरांडे यांनी जाफराबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, आरोपी दादाराव उर्फ गजानन दलसिंग दधरे या खापरखेडा (ता. जाफराबाद) यांनी खून केला. दधरे यांनी राजेंद्र बरांदे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप पाच ते सहा वार करून जागीच ठार केले. गेल्या काही दिवसांपासून आरोपी मयताकडे शेती जमीन नावावर करून देण्यासाठी वाद करीत होता. त्यांच्यात मेव्हणा व भाऊजीचे नाते असून आई-वडिलांकडून मिळालेल्या जागेवरून हा वाद सुरू होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक धावडे करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले. घटना घडल्यापासून आरोपी गायब झाला आहे. (वार्ताहर)
शेतीच्या भांडणातून एकाचा खून
By admin | Updated: November 25, 2014 00:56 IST