लातूर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून, २०१४-१५ साठी लातूर जिल्ह्याला ३६ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले असतानाही सध्यापर्यंत ८ हजार ७१४ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. हे उद्दिष्ट ११ महिन्यांनंतरही निम्म्यावरच अडखळले आहे. ‘निर्मल भारत अभियान’चे नामकरण करून २ आॅक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) असे नामकरण करण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये वैयक्तिक शौचालयाकरिता केंद्राचा हिस्सा ९ हजार (७५ टक्के) व राज्याचा हिस्सा ३ हजार (२५ टक्के) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून स्वच्छतागृहाच्या मोहिमेला गती येणे आवश्यक आहे. परंतु, लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २०१४-१५ या कालावधीत सध्यापर्यंत ८७१४ एवढ्या बोटांवर मोजण्याइतकेच स्वच्छतागृह झाले आहेत. तर उर्वरित २७ हजार २८६ स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. याउलट जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छतागृहाच्या बाबतीत लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी असल्याचा डंका वाजवीत आहे. (प्रतिनिधी)४‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत शौचालय निर्मितीला गती देण्यात येत असली, तरी वर्षभरासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट निम्म्यावरच आहे. याला गती देण्यासाठी शौचालय उभारणीसाठी अनुदानाची जनजागृती करण्याऐवजी कमी खर्चामध्ये शौचालय उभारणीची जनजागृती करावी. यामुळे सर्वसामान्य नागरिकांतूनही शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण होईल, असे जिल्हा परिषदेच्या बहुतांश सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शौचालय निर्मितीसाठी केंद्र व राज्य शासन नवनवीन योजना अंमलात आणत असले तरी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांना शौचालय उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आदेश दिले असतानाही शौचालय उभारणीबाबत अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्यामध्ये शौचालय उभारणीबाबत उदासिनताच दिसून येत आहे.
उद्दिष्ट निम्म्यावरच अडखळले !
By admin | Updated: November 24, 2014 00:35 IST