नांदेड : शहरात अपार्टमेंटची संख्या वाढत असून छोटी छोटी मैदाने गायब होवू लागली आहेत़ जी मैदाने आहेत त्यांना बकालावस्था प्राप्त झाली आहे़ परिणामी घरासमोरील रस्तेच चिमुकल्यांसाठी खेळपट्टी झाले आहेत़ उन्हाळ्याच्या सुट्या आणि आयपीएलची धुमश्चक्री सध्या सुरू आहे़ मामाचे गाव हरवलेल्या मुलांना आपल्या आवडी आता घरातच शोधत बसावे लागत आहे़ टीव्ही समोर तासन्तास बसलेल्या मुलांना कंटाळा आला की आपला आवडता खेळ क्रिकेट खेळावे वाटते़ मात्र शहरात खेळण्यासाठी मैदानेच नसल्याने नाइलाजाने मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे़ क्रिकेट असो वा फुटबॉल हे मैदानी खेळ रस्त्यावरच खेळले जात आहेत़ रस्त्यावर अपघात होतात म्हणून अनेक जणांना इच्छेला मुरड देत सक्तीने कॉम्प्युटर गेम खेळावे लागत आहेत़ सुटीमध्ये खेळायला कुठे जाता ? असा प्रश्न घेवून लोकमतने बालमित्रांचे मत जाणून घेतले़ त्यामध्ये २० टक्के बालमित्र बागेमध्ये, ३० टक्के रस्त्यावर आणि केवळ २० टक्के मैदानावर जात असल्याचे दिसून आले आहे़ मातीमध्ये खेळताना पडणे, खरचटणे, त्यातून शिकण्याचा अनुभव मिळणे आता विरळच़ त्यामुळे इमारतीच्या बाहेरील रस्त्यांवरील दुपारी किंवा रात्री वाहनांची गर्दी कमी असली की, खेळायचे असा चिमुकल्यांचा सुटीतील दिनक्रमच बनू लागला आहे़ आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे चिमुकल्यांचा ओढा मैदानी खेळ खेळण्याकडे वाढत आहे़ सुमारे ५० टक्के मुला - मुलींना मैदानी खेळ खेळायला आवडत असल्याचे समोर आले आहे़ त्यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट, फुटबॉल, तर इनडोअर गेम्समध्ये बॅडमिंटन आणि टेनिस खेळायची क्रेझ वाढली आहे़ परंतु पुरेशी मैदाने नसल्याने त्यांच्या आवडीला वाव मिळेनासा झाला आहे़ (प्रतिनिधी) मैदानात खेळणे मुलांचा हक्क जसे प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे तसेच प्रत्येक बालकाला मैदानात विविध खेळ खेळण्याचा हक्क आहे; पण शहरात मैदानांची संख्या कमी झाल्याने मुलांचा मैदानात खेळण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे़ नाइलाजाने कॉलनीच्या कोपर्यात, घरासमोरील रस्त्यावर मुलांना जीव धोक्यात ठेवून खेळावे लागत आहे़ शहरात अजूनही बोटावर मोजता येतील एवढी मोठी मैदाने तग धरून आहेत़ श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम येथे खेळण्यासाठी शुल्क आकारण्यात आले आहे़ त्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य मुलांना क्रिकेट किंवा इतर खेळ खेळण्यास बंदी आहे़ काही मैदाने शहरात आहेत ती घरापासून दूर अंतरावर असल्याने मुलांना त्या मैदानावर दररोज खेळण्यासाठी जाणे अशक्य होते़ महापालिकेने मैदानांची जागा निश्चित करून त्यांचा विकास करावा़ बुद्धिबळ, कॅरम खेळू या दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्यापेक्षा पालक मुलांना बैठे खेळ खेळायला सांगतात़ सध्या चिमुकल्यांना बैठ्या खेळांमध्ये सर्वात जास्त बुद्धिबळ आणि कॅरम खेळायला आवडते़ तर काही वर्षांपूर्वी आवडते असलेले पत्ते आणि नवा व्यापारासारखे खेळही अनेक मुले- मुली आजही तितक्याच आवडीने खेळतात़ सापशिडी मात्र काही प्रमाणात हरवत असून त्याची जागा वैज्ञानिक आणि बौद्धिक खेळांनी घेतल्याचे दिसून आले आहे़ कॉम्प्युटर गेम्सचे वेड मैदानावर जाऊन मातीत खेळणे, रस्त्यावर किंवा बागेत जाऊन धिंगाणा घालण्यापेक्षा घरात बसून कॉम्प्युटरवरील गेम्स खेळण्याकडे २५ टक्क्यांहून अधिक मुलांचा कल आहे़ कॉम्प्युटर गेम्स येण्यापूर्वी व्हिडिओ गेम्स मोठ्या प्रमाणात खेळले जात होते़ यामुळे डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत़
आता तुम्हीच सांगा़़़ आम्ही खेळायचे तरी कुठे?
By admin | Updated: May 11, 2014 00:39 IST