जालना : शहरातील बंद पथदिवे सुरू करण्यासाठी नगरपालिकेने तेराव्या वित्त आयोगातून ३.६० कोटींच्या रक्कमेचा भरणा करण्याची तयारी दर्शविली असून यासंबंधीचा प्रस्ताव महावितरणकडे ठेवण्यात आला आहे. ही रक्कम मार्चपूर्वी भरण्यात येईल, मात्र त्यापूर्वी पथदिवे सुरू करावेत, असेही पालिकेने म्हटले आहे. अक्षय योजनेचे दोन हप्ते थकीत राहिल्याने महावितरणने नगरपालिकेचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केल्याने शहरातील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. शहरात एकूण १३०० पथदिवे आहेत. मात्र त्यापैकी अनेक दिवे खराब झाल्याने बंद आहेत. पथदिव्यांच्या वीज बिलापोटी थकबाकीची रक्कम १४ कोटींवर गेल्याने दोन वर्षांपूर्वीपासून महावितरणने पालिकेच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर नगरपालिकेने केलेल्या पाठपुराव्यानंतर अभय योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला. त्यामुळे पालिकेला ७ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा करावा लागणार होता. या योजनेअंतर्गत पालिकेला प्रत्येकी १ कोटी ८० लाख रुपयांचे चार हप्ते पाडून देण्यात आले होते. परंतु त्यापैकी दोन हप्ते पालिकेने भरणा केला. हप्ते नियमित सुरू झाल्यामुळे महावितरणने गेल्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला होता. परंतु पालिकेने पुन्हा हप्ते थकविले. दोन हप्ते थकीत राहिल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. परिणामी शहरात काही भागात सुरू झालेले पथदिवेही सध्या बंद आहेत. पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार जाणवत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. सायंकाळनंतर महिलांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले. अशा परिस्थितीत महावितरणच्या देयकाचा प्रश्न कसा सुटणार, असा पेच निर्माण झाला होता. त्यावर नगरपालिकेने तोडगा काढला आहे.याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे म्हणाले की, महावितरणचे ३.६० लाख रुपयांचा भरणा आम्ही केलेला आहे. एवढ्याच रक्कमेचा भरणा बाकी आहे. तो आम्ही तेराव्या वित्त आयोगातील निधीद्वारे भरणार आहोत. शिवाय चालू महिन्यांच्या बिलाचा भरणा आम्ही वेळेवर करीत आहोत. त्यामुळे महावितरणने पथदिवे सुरू करावेत, अशी आमची मागणी आहे. याबाबत आमचा पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी)
्नरस्ते आता उजळणार!
By admin | Updated: December 28, 2014 01:14 IST