नांदेड : किनवटच्या उपप्रकल्प अधिकारी कार्यालयातंर्गंत काम करणाऱ्या जिल्ह्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आयकर (इनकम टॅक्स) कापण्यात आला. मात्र इनकम टॅक्सने संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्याने कपात केलेली रक्कम कुणाच्या खिशात गेली? हा औसुक्याचा विषय बनला आहे.किनवटचे आदिवासी उपप्रकल्प अधिकारी कार्यालय सतत चर्चेत असते. या कार्यालयाचे प्रमुख म्हणून किनवटचे उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी आहेत. या कार्यालयातंर्गंत जिल्ह्यातील २८ अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील जवळपास ६०० शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी येतात. या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही. पूर्ण पगार कधी खात्यावर जमा होईल, याची खात्री नाही. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांनी १७ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. शिक्षक, कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत, मात्र आदिवासी उपप्रकल्प अधिकारी कार्यालयातील संबंधित ‘टेबलबाबू’ अद्यापही हलायला तयार नाहीत. या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम संबंधित वरिष्ठ करीत आहेत की काय? अशी शंका व्यक्त होत आहे. एकूणच किनवटच्या उपप्रकल्प अधिकारी कार्यालयाबद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत. शिक्षक, कर्माऱ्यांची कामे वेळेवर पूर्ण केली जात नाहीत, यामध्ये जी.पी.एफ.ची मागणी, वैद्यकीय बिले देखील ६ महिने ते वर्षभरापासून निकाली काढलेली नाहीत. तसेच दरमहा कपात केल्या जाणाऱ्या भविष्यनिर्वाह निधीचा वार्षिक हिशेब प्रत्येक शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जात नाही.एकंदरीत प्रकल्प कार्यालयाची अवस्था ‘आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातेय’’ अशी झाली आहे. यासंदर्भात उपप्रकल्प अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
शिक्षक, कर्मचाऱ्यांना नोटिसा
By admin | Updated: September 16, 2014 01:30 IST