लातूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत जुन्या रेल्वेलाईनवरील रस्त्याचे डांबरीकरण करून दुभाजक उभारण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ ३ कोटी ३४ लाख रूपये खर्च असलेल्या या कामासाठी मागविण्यात आलेल्या निविदेत सेटिंग झाल्याचा आरोप झाला असला तरी धनचंद्र कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली़ बैठक संपताच दोन तासाच्या आत या कामाचे उद्घाटनही झाले़ ३ कोटी ३४ लाखांच्या निधाीतून मिनी मार्केट ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते पाण्याची टाकी रस्ता विकसित करणे़ शिवाजी चौक ते पाण्याच्या टाकीपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण व रस्ता अनुदान योजनेअंतर्गत शिवाजी चौक ते पाण्याची टाकी (रेल्वेलाईन रस्ता) येथील रस्त्यावर दुभाजकाचे बांधकाम करण्यात येणार आहे़ पाण्याची टाकी ते पीव्हीआर चौक येथील रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे़ या कामासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये कमी दराची निविदा असतानाही ती उघडण्यात आली नसल्याचा आरोप नगरसेवक राहुल माकणीकर यांनी केला होता़ त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करताना बराच वेळ चर्चा झाली़ स्थायी समितीचे सदस्य शैलेश स्वामी यांनी शहरातील कत्तलखाना इतरत्र हलविण्यात यावा, असे पत्र दिले होते़ कायमस्वरूपी स्लॉटर हाऊस उभारणीसाठी जागेचा शोध घेऊन तो उभारणीचे अधिकार सभापती अख्तर मिस्त्री यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत़ यावर काही सदस्यांनी आक्षेप घेत समिती स्थापन्याची मागणी केली होती़ स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री अध्यक्षस्थानी होते़ आयुक्त सुधाकर तेलंग, सहाय्यक आयुक्त प्रदिप ठेंगळ, राम कोंबडे, अजगर पटेल, कैलास कांबळे, राजा मणियार, केशरबाई महापुरे, डॉ़ रूपाली सोळुंके, चंद्रकांत चिकटे, रवी सुडे, आशा स्वामी आदींची उपस्थिती होती़
‘त्या’ निविदेला स्थायी समितीने दिली मंजुरी
By admin | Updated: September 2, 2014 01:51 IST