अशोक कांबळे, वाळूज महानगरसिडको वाळूज महानगरात नागरी सुविधा पुरविण्याचे आश्वासन प्रशासनाने देऊन चार महिने उलटले तरी त्या पुरविल्या नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सिडको प्रशासनातर्फे जुलैपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे, गोविंद हिल्स येथे सिग्नल बसविणे व गतिरोधक उभारणे, बस थांबा उभारणे, अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे, सिडको कार्यालयासमोरील उघड्या नालीवर ढापे टाकणे, कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी सुरू करणे, उद्यान विकसित करणे या सर्व नागरी सुविधा देण्याचे आश्वासन सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी २३ मे रोजी झालेल्या बैठकीत दिले होते. चार महिने उलटले तरी समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. सध्या तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने व कचराकुंड्या नसल्याने नागरिकांना नाइलाजास्तव रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत आहे. हा कचराही प्रशासनाकडून वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे डास व दुर्गंधीचा फैलाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून आदळआपटीचा त्रास सहन करीत ये-जा करावी लागत आहे. सिडको कार्यालयासमोरील उघड्या नालीवर ढापे न टाकल्यामुळे दुर्गंधी पसरली असून, रात्रीच्या वेळी नालीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. केंद्रेकर यांच्या गैरहजेरीत सिडकोचे अधिकारी नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. केंद्रेकर यांनी दिलेल्या आश्वासनाची प्रशासनाने पूर्तता करावी, अशी मागणी मारुती गायकवाड, राजेंद्र जाधव, नायबराव देशमुख, स्वामीनाथ केदार, विलास नवले, हनुमंत खोसे, आनंद देशपांडे, रमेश खोसे, करण साळे आदींनी केली आहे.
सुविधा देण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Updated: September 17, 2014 01:15 IST