औरंगाबाद : गेल्या तीन महिन्यांत पाच वेळा रेल्वे सुरक्षा बलाच्या नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला नाहक त्रास दिला आहे. आपण तिकिटासाठी अधिक पैसे घेत असल्याची तक्रार देण्यासाठी प्रवाशांवरही दबाब आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने केला आहे, तर या आरोपात काही तथ्य नसल्याचे सदर अधिकऱ्यांनी म्हटले.याबाबत रेल्वे सुरक्षा बल, महिला तक्रार निवारण कें द्र, सिकंदराबाद येथील महिला हक्क समितीकडे तक्रार केली असल्याचे सदर महिला कर्मचाऱ्याने सांगितले. वारंवार सदर अधिकारी आपल्या काऊंटरवर येऊन असभ्य भाषा वापरून नाहक त्रास देत आहे. प्रवाशांची तिकिटे हिसकावून आपण अधिक पैसे घेतल्याची तक्रार द्यावी, यासाठी प्रवाशांवर दबाव टाकला. प्रामाणिकपणे कामकाज करीत असतानाही त्रास सहन करावा लागत असल्याचे सदर कर्मचाऱ्याने सांगितले. याविषयी सदर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदर आरोपात काही तथ्य नसून आपले कर्तव्य असल्याने तपासणी करावीच लागते. केवळ त्यांनाच टार्गेट केले जात आहे, असे नाही.आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅ मेऱ्याची सुविधा नाही. वारंवार मागणी करूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तात्काळ तिकिटांसाठी होणारा गैरप्रकार, दलालांवर नियंत्रण आणण्यास अडचणी येत आहेत. याशिवाय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोपांत किती तथ्य आहे, हेदेखील सीसीटीव्ही कॅ मेऱ्यामुळे समोर येण्यासाठी महत्त्वाचे ठरले असते, अशी चर्चा सध्या रेल्वेस्थानकावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
अधिकाऱ्यांकडून होतोय नाहक त्रास
By admin | Updated: July 8, 2014 01:04 IST