पालम : पेरणीच्या तोंडावर राष्ट्रीयीकृत बँकांतून पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी सुरू केली आहे़ अपुरा कर्मचारी वर्गामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत़ तसेच राष्ट्रीयीकृत बँकांना गावे दत्तक नसल्याने अनेक गावातील शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत़ जून महिना जवळपास अर्धा संपला आहे़ शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून ठेवली आहेत़ जुने पीककर्ज भरून नवीन पीक कर्ज घेतले जात आहे़ बियाणांची खरेदी, रासायनिक खत, औषधी आदींची खरेदी करण्यासाठी दरवर्षी शेतकरी पीक कर्ज काढत असतात़ मागील वर्षीच्या व्याज व मुद्दल रक्कम भरून नवीन प्रस्ताव बँकेकडे सादर केले जात आहेत़ कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांचे दमछाक होत आहे़ सध्या तरी जुन्या पीककर्ज धारकांनाच वाढीव कर्ज दिले जात आहे़ नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप अजूनही सुरू झालेले नाही़ बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर व्यवहार सांभाळक पीक कर्ज घेताना कसरती कराव्या लागत आहेत़ पालम शहरातील तिन्ही राष्ट्रीयकृत बँकांकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे़ यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळणे मुश्कील झाले आहे़ जसजशी पेरणी जवळ येईल त्या प्रमाणे बँकेतील गर्दीत वाढ होत आहे़ (प्रतिनिधी)पीककर्ज मिळेनाराष्ट्रीयीकृत बँकांनी गावे दत्तक घेतली आहेत़ दत्तक घेतलेल्या गावांतील शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज दिले जात आहे़ परंतु, तालुक्यातील बरीच गावे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेकडे दत्तक नाहीत़ त्यामुळे दत्तक नसलेल्या गावांतील शेतकऱ्यांकडून अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे़ या गावांनी लीड बँकेकडे वारंवार तक्रारी करूनही लक्ष देण्यास आलेले नाही़ यामुळे या गावातील शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत़ पूर्णा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला पालम तालुक्यातील गावे दत्तक आहेत़ पालम ते पूर्णा ३६ किमीचे अंतर असल्याने शेतकरी बँकेकडे जाण्यास धजावत नाहीत़ त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेच्या वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष देऊन दत्तक नसलेली गावे बँकांना दत्तक घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे़
पीककर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांत गर्दी
By admin | Updated: June 19, 2014 00:17 IST