वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व परिसरातील काही गावांमध्ये गुरूवारी दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान मोठ्या गूढ आवाजाने जमीन हादरली. मात्र हा आवाज कशाचा होता, हे अखेरपर्यंत स्पष्ट झाले नाही.वडीगोद्री, शहागड, गोंदी, साष्टपिंपळगाव, आंतरवाली सराटी, विज्ञानेश्वर आपेगाव, भांबेरी, टाका, दूनगाव, महाकाळा यासह अनेक गावात तसेच गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथेही हा गूढ आवाज आला.या आवाजाने त्या त्या गावांमधील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. विहिरीमधील ब्लास्टिंगचा किंवा तोफेचा आवाज असेल, असा अंदाज अनेकांनी बांधला. किंवा काहींना मोठ्या वाहनाचे टायर पंक्चर झाल्याने असा आवाज झाला असावा, अशी शंका आली. काही ठिकाणी ग्रामस्थांना कुठेतरी सौम्य भूकंप झाला, अशी भीती देखील जाणवली. परंतु याबाबतचे रहस्य आज दिवसभर कायम राहिले. या आवाजाबद्दल सरकारी दरबारी कुठलीही माहिती नाही.अंबडचे तहसीलदार महेश सावंत यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, भूगर्भातील हालचालींमुळे किंवा वातावरणातील बदलामुळे असा आवाज होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आमच्याकडे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देखील याबाबतची कसलीही माहिती नव्हती. या गूढ आवाजाने वडीगोद्री परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये मात्र घबराट निर्माण झालेली दिसून आली. आवाजाचे रहस्य कायम होते.
वडीगोद्री परिसरात गूढ आवाजाने खळबळ
By admin | Updated: November 28, 2014 01:10 IST