कळंब : शहरातील नवीन सराफ लाईन भागातील १२ गाळेधारकांना अतिक्रमणे हटविण्याची नोटीस नगर पालिका प्रशासनाने दिली आहे़ १० दिवसांच्या मुदतीत संबंधितांनी अतिक्रमणे काढली नाहीत तर पालिा प्रशासन स्वत: कारवाई करेल, असा इशाराही नोटीसीत देण्यात आला आहे़कळंब शहरातील नवीन सराफ लाईन भागात काही सराफ व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे करून पक्के बांधकाम केल्याची तसेच कराराने दिलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागेचा वापर केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय तनपुरे यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती़ या तक्रारीनंतर पालिकेने कार्यवाही न केल्याने तनपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेवून तक्रार केली होती़ या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार व पालिकेची बाजू ऐकूण घेतल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हे अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतरही पालिका प्रशासनाने कारवाई केली नाही़ तक्रारदार तनपुरे यांनी याबाबत वारंवार पालिका प्रशासनाला स्मरणपत्र देवून कार्यवाही करण्याची मागणी केली होती़ पालिकेने याबाबत विधीतज्ञांचे मत घेवून अखेर २८ मार्च रोजी १२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याची नोटीस बजावली आहे़ ६ एप्रिल पर्यंत अतिक्रमणे न हटविल्यास पालिका प्रशासन स्वत: अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करेल, असा इशाराही देण्यात आला आहे़सध्या सराफ व्यापाऱ्यांचे बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे़ त्यामुळे या भागातील सराफांची दुकाने बंद आहेत़ पालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना ६ एप्रिलची डेडलाईन दिल्याने ही अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत़ या अतिक्रणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी, विधीतज्ञांनीही स्पष्ट भूमिका घेतली आहे़ त्यामुळे पालिका प्रशासनाला राजकीय दबावालाही जुमानने परवडणारे नाही़ त्यामुळे आता ६ एप्रिल नंतर अतिक्रमणे हटविण्याबाबत पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे़ (वार्ताहर)
गाळेधारकांना पालिकेची नोटीस
By admin | Updated: March 30, 2016 00:42 IST