आशपाक पठाण , लातूरकाँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या लातूर शहर महापालिकेत पक्षाचे चार स्वीकृत नगरसेवक आहेत. स्वीकृत म्हणून घेतलेल्या सदस्यांकडून पक्ष नेतृत्वाने मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन जणांनी बंडखोरी केली. तर अन्य दोघांपैकी एकाने पक्षाचे सक्रिय काम केले. तर दुसऱ्यावर स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत संशयच व्यक्त केला आहे. एकंदरित, स्वीकृत नगरसेवकांकडून पक्षाला मिळाले काय, याचे उत्तर मात्र पक्ष नेतृत्वालाही मिळेनासे झाले आहे. स्वीकृत नगरसेवक रविंद्र पाठक यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा नव्याने स्वीकृत नगरसेवकांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यावर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. ७० सदस्य संख्या असलेल्या मनपात काँग्रेसचे ४९, राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, शिवसेनेचे ७ व रिपाइंचे २ सदस्य आहेत. काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने चार जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. त्यात भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कुलदीपसिंह ठाकूर यांचा समावेश होता. त्याचबरोबर रविंद्र पाठक, सय्यद ताजोद्दीनबाबा, जयप्रकाश दगडे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाली. प्रारंभीपासूनच ज्येष्ठांना संधी दिल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पक्षाला यांच्याकडून फायदा होईल की तोटा, या चर्चा निवडीनंतर अद्यापही कायम आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसचे स्वीकृत सदस्य रविंद्र पाठक यांनी उघडपणे भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला. यापूर्वीच कुलदीपसिंह ठाकूर यांनी कचरा, पाणी व अन्य सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन अपयशी असल्याचा आरोप करीत बंडखोरी केली व आपल्या जुन्याच स्वगृही भाजपात त्यांनी प्रवेश केला. काँग्रेसमधून भाजपात गेल्यावर ठाकूर यांनी स्वीकृत सदस्याचा राजीनामा मात्र अजूनही दिलेला नाही. काँग्रेसकडून स्वीकृत असलेले कुलदीपसिंह ठाकूर भाजपाच्या गोटात कार्यरत आहेत. ठाकूर यांच्यानंतर रविंद्र पाठक यांनी मनपा पदाधिकारी, पक्षाचे स्थानिक नेते यांच्यावरच तोफ डागायला सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाठक यांनी भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा उघडपणे प्रचार केला. गेल्या काही दिवसांपासून पक्षात घूसमट होत असल्याने आपण स्वीकृत सदस्याचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पाठक यांनी सांगितले. त्याचबरोबर तिसरे सदस्य सय्यद ताजोद्दीनबाबा हेही पक्षाच्या कार्यक्रमात फारसे सक्रिय नसल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. भाजपाचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्याशी त्यांची ‘गाडी’मैत्री असल्याचे बोलले जात आहे. तर जयप्रकाश दगडे हे स्वीकृतमधील एकमेव सदस्य पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत. चारपैकी तीन सदस्यांनी पक्षाला काय दिले, याचे उत्तर शोधण्यात पक्ष नेते मश्गूल आहेत. ४काँग्रेस पक्षात काम करायला संधी दिली जात नाही. त्यामुळे घूसमट होत होती. अनेकवेळा सांगूनही फरक पडला नाही. त्यामुळे मनपाच्या स्वीकृत सदस्यत्वाचा राजीनामा मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांच्याकडे दिला आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून भाजपात आपल्या परीने पक्षाचे काम करीत असल्याचे रविंद्र पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ४काँग्रेसच्या चार स्वीकृत सदस्यांपैकी केवळ एक सदस्य पक्षात सक्रिय असल्याने अन्य तिघांचे काय होणार? यातील एकाने राजीनामा दिला आहे. अन्य एक सदस्य भाजपात यापूर्वीच दाखल झाला आहे. तर एका सदस्याचे तळ्यातमळ्यात आहे. त्यामुळे त्या दोघांचे राजीनामे घेतले जातील व नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा शहरात रंगली आहे.रविंद्र पाठक यांनी १५ दिवसांपूर्वी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नव्हे तर राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी भाजपात ‘घरोबा’ केला आहे. त्यामुळे आता राजीनामा मंजूर होणार, हे नक्की असल्याने काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारिणीवर प्रमुख पदाधिकारी असलेल्या एकाने स्वीकृत सदस्यत्व मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मनपा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर स्वीकृत सदस्यत्व मिळविण्यासाठी ते कामाला लागले आहेत. त्यांच्या नावाची चर्चाही मनपात रंगली आहे.
महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांचा सवतासुभा !
By admin | Updated: December 15, 2014 00:45 IST