परभणी : पावसाने ताण दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ अतिवृष्टीमुळे रबी हंगाम गेला आणि पावसाअभावी खरीप हंगामही गेला आहे़ त्यामुळे मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असून, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खा़ बंडू जाधव यांनी दिली़जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी ११ आॅगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे़ या मोर्चाच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यासाठी खा़ बंडू जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली़ ते म्हणाले, मराठवाडा वगळता अन्य भागात पाऊस आहे़ परंतु, मराठवाड्यात मात्र कोरडा दुष्काळ पडला आहे़ ही परिस्थिती आपण केंद्र शासनाकडे मांडली आहे़ परंतु, राज्य शासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे़ जिल्ह्यातील पिके असमाधानकारक आहेत़ शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागलेले नाही़ त्यामुळे नैराश्येत असलेल्या या शेतकऱ्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे़ त्यामुळेच बैलगाडी मोर्चाद्वारे सरकारला जागे केले जाणार आहे़ मराठवाड्यासाठी केंद्राकडून पाहिजे ती मदत मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु़ त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या पायी मोर्चा संदर्भात आ़ जाधव म्हणाले सत्तेत असताना मोर्चा काढावा लागतो हे दुर्भाग्य आह़े़ मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे़ या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व पक्षांनी मिळून रस्त्यावर उतरले पाहिजे़ अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वांनी मिळून पुढाकार घेतल्यास आम्ही त्याचे स्वागत करू, असेही ते यावेळी म्हणाले़ अतिवृष्टीतील नुकसानीची मदत अनेक गरजू लोकांपर्यंत पोहचली नाही़ त्यामुळे दुष्काळ जाहीर केला तरी गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचावी, यासाठी पारदर्शकपणे मदत वाटप करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली़ पीक कर्ज वाटपातही मोजक्याच लोकांना बँकाकडून कर्ज वाटप होत असल्याचे ते म्हणाले़ या पत्रकार परिषदेला युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ़ राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, डॉ़ संजय कच्छवे, जि़प़तील गटनेते गंगाधरराव कदम यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन
By admin | Updated: August 10, 2014 00:09 IST