भूम : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, चाऱ्याअभावी पशुधनाची उपासमार होत आहे. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र चारा छावण्यांना मंजुरी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत येथील गोलाई चौकात सोमवारी आ. राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आ. मोटेंसह काही पदाधिकाऱ्यांनी जामीन नाकारल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळे पशुधनाची संख्याही लाखाच्या वर आहे. यात दुभत्या जनावरांची संख्या अधिक असून, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची उपासमार होत आहे. तालुक्यात सध्या ३१ चारा छावण्या सुरू असून, यात २९ हजार १०६ पशुधन जगविले जात आहे. तालुक्यातील ९७ गावातून आतापर्यंत ८० प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. यातील ३८ प्रस्ताव कुठलेही कारण न देता परत पाठविण्यात आले तर ११ प्रस्ताव त्रुटीअभावी परत आले आहेत. उर्वरित ३१ छावण्यांना परवानगी देण्यात आली असून, त्या सुरूही झाल्या आहेत. याशिवाय काही संस्थांनी परवानगी नसतानाही पशुधनाची उपासमार टाळण्यासाठी छावण्या सुरू केल्या आहेत. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र चारा छावण्यांना मंजुरी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आ. मोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक पशुपालक पशुधन व बैलगाड्यांसह सहभागी झाल्यामुळे चौकात मोठी गर्दी झाली होती. आंदोलनात आ. मोटेंसह गटनेते संजय गाढवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, आर. डी. सूळ, अण्णा भोगील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुनील भोईटे, राजाभाऊ हुंबे, अॅड. सुंदरराव हुंबे, गौरीशंकर साठे, राजकुमार घरत, आशिष गिलबिले, प्रदीप काकडे, सुशेन जाधव, ज्ञानेश्वर दीपे, प्रताप देशमुख यांच्यासह राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्याच्या विविध भागातील पशुपालक शेतकरी पशुधन तसेच बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)जिल्ह्यात ६१ चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. यातील ४८ छावण्या सुरू असून, यामध्ये ४३ हजार जनावरांची व्यवस्था झाली आहे. एकट्या भूम तालुक्यात ३१ छावण्यांना मंजुरी दिलेली असून, त्यातील ३० सुरू आहेत. यामध्ये २९ हजार जनावरांच्या चारा-पाण्याची सोय करण्यात आली आहे. उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातही छावण्यांची आवश्यकता पडणार आहे. मात्र लोकसहभागातून छावणी सुरू करीत असल्याचे सांगत काहीजण आता अनुदान मागू लागले आहेत. भूम तालुक्यातील ३१ छावण्यात प्रत्येकी तीन हजार जनावरे गृहीत धरली तरी ९३ हजार पशुधन राहू शकते. प्रत्यक्षात भूम तालुक्यात ६५ हजार पशुधन आहे. आवश्यतेनुसार छावण्या देण्याचे धोरण असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
मोटेंनी नाकारला जामीन
By admin | Updated: December 28, 2015 23:24 IST