गजेंद्र देशमुख , जालना जालना लोकसभा मतदार संघातून ओळीने चौथ्यांदा विजय मिळवितांना खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी सहाही विधानसभा मतदारसंघातून २०६३३८ एवढे मताधिक्य मिळविले. सर्वच विधानसभा मतदार संघात मोदींचा जलवा दिसून आला. या लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकदन, सिल्लोड, फुलंब्री व पैठण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सहा मतदार संघापैकी काँग्रसेचे तीन आमदार, राष्ट्रवादीचे दोन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवरही काँग्रेस - राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत हे विशेष. अशा भक्कम पाठिंब्यामुळे काँग्रस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांचा विजय सुकर असतानाही मोदी लाटेमुळे पराभवाचा सामना करावा लागला. भोकरदन विधानसभा मतदार संघ वगळता खा. दानवेंची जादू अथवा प्रभाव म्हणावा तसा नाही. भरीव विकास कामेही केलेली नाहीत. वातावरण विरोधी असतानाही या निवडणुकीत सर्वच विधानसभा मतदार संघात दानवे यांच्या मताधिक्यात गतवर्षीच्या तुलनेत मोठी वाढल्याचे आकडे सांगतात. फुलंब्री विधानसभा मतदार संघावर दहा वर्षांपासून काँग्रेसचा दबदबा आहे. काँगे्रसचे कल्याण काळे हे तेथील आमदार आहेत. तरी भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखविली. यात माजीमंत्री हरिभाऊ बागडे, डॉ. नामदेवराव गाडेकर, भागवत कराड, शिवाजी पाथरीकर यांचा दानवे यांच्या यशात मोठा वाटा असल्याचे म्हणावे लागले. या निवडणुकीत पैठण विधानसभेतून रावसाहेब दानवे यांना ३३ हजार २८९ एवढे मताधिक्य मिळाले. पैठण विभानसभेत राष्ट्रवादी काँग्रसेच विद्यमान आ. संजय वौघचौरे यांच्या विषयी असलेली नाराजी खा. दानवेंना फायद्याची ठरली. राष्ट्रवादीचा दबादबा असूनही दानवेंनी मोठे माताधिक्य खेचले. दानवे यांनी कोणतेही विकास कामे केले नसल्याचा मोठा गाजावाजा झाला. पैठणची जनता दानवेंना हात दाखवेल असे दावे- प्रतिदावे होऊनही नरेंद्र मोदींच्या जादूने दानवे यांच्या पारड्यात ३८८९२ एवढे मताधिक्य टाकले. सिल्लोड - सोयगाव तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसचे आ. अब्दुल सत्तार यांनी जोरकस प्रयत्न करुन आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना मताधिक्य मिळावे म्हणून मोठे परिश्रम घेतले. बैठका लावल्या, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात मोट बांधली. सिल्लोड शहर व पालोद जि.प. गट वगळता औताडे यांच्यापेक्षा दानवेच आघाडीवर असल्याची चर्चा आहे. सिल्लोड - सोयगाव मधून ३० हजारांपेक्षा जास्त माताधिक्य दानवे यांना मिळाले. सिल्लोड विधानसभा मतदार संघात सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन सुरेश बनकर, दिलीप दाणेकर, इद्रिस मुलतानी, सुनील मीरकर, ज्ञानेश्वर मोठे, हरिकिसन सुलताने, राजेंद्र ठोंबरे, सांडू लोखंडे, अशोक गरुड यांनी महायुतीच्या पदाधिकार्यांनी दानवेंसाठी मोठी खिंड लढविली. २९७१९ एवढे मताधिक्य मिळविले. भोकरदन - जाफराबाद विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त ७१ टक्के मतदान झाले हाते. वाढीव मतदानाचा फायदा खा. दानवे यांना झाल्याचे स्पष्ट दिसून येते. मोदींची लाटच निर्णायक ठरली. महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या पाठिशी भक्कम पाठिंबा उभा केला. हा विधानसभा मतदार संघ दानवे यांचे होमपीच असले तरी खा दानवे यांच्याविषयी काही अंशी असलेल्या नाराजीचा दगाफटका बसण्याची दाट शक्यता मोदी लाटेने क्षीण केली. विद्यमान आ. चंद्रकांत दानवे यांच्याविषयी असलेला नाराजीचा सूर खा. दानवे यांच्या फायद्याचा ठरला. या विधानसभा मतदार संघात २८२३८ एवढे मताधिक्य दानवे यांना मिळाले. निर्मलाताई दानवे, संतोष दानवे, शिवाजी थोटे, अरुण वाघ, लक्ष्मण मळेकर, राजेंद्र देशमुख, गणेश फुके,मधुकर दानवे, रमेश गव्हाड, गोविंद पंडित, शालिक म्हस्के, कौतिक जगताप, नाना भागिले, प्रकाश गव्हाड, गणेशराव रोकडे, शेषराव कळंबे, कैलास गव्हाड, आशाताई माळी, वर्षा देशमुख, समाधान शेरकर, रमेश पांडे आदींनी मोठे परिश्रम घेतले. जालना विधानसभा काँग्रेसच्या ताब्यात आहे. विलास औताडेंना स्थानिक आ. कैलास गोरंट्याल तसेच आघाडीच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्याचा मोठा भाग प्रचारासाठी पिंजून काढला. आ. गोरंट्याल यांनी पदाधिकारी व कार्याकर्त्यांत समन्वय साधत प्रचाराची मोट बांधली. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभांमुळे वातावरण काँग्रेस उमेदवारासाठी अनुकूल बनले होते. जालना विधानसभा मतदार संघातून खा. दानवे यांना २९२९९ एवढे मताधिक्य मिळाले. बदनापूर विधानसभा मतदार संघ पारंपरिकतेने महायुतीकडेच आहे. या विधानसभा मतदार संघात दानवे यांना ४६ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. माजी आ. अरविंद चव्हाण यांचा अपवाद वगळता गत वीस वर्षांपासून मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या मतदार संघात युवा तसेच नवमतदारांचा मतदानाचा टक्का वाढला. वाढलेल्या मतदानाचा फायदा दानवे यांना झाला. आ. संतोष सांबरे आदींनी दानवे यांच्यासाठी परिश्रम घेतले.
सर्वच विधानसभेत मोदींचा जलवा
By admin | Updated: May 17, 2014 00:19 IST