उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत बीडकर तलावात बांधण्यात येत असलेल्या अद्ययावत स्नानगृहाचे काम प्रगतीपथावर आहे़ प्रशस्त अशा स्नानगृहात भाविकांचे साहित्य ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ महिला-पुरूषांसाठी दोन कुंड स्वतंत्र बांधण्यात येत असून, एकावेळी मोठ्या संख्येने भाविकांना स्नान करता येईल, अशी सुविधा इथे करण्यात येत आहे़तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत जवळपास पावणेचारशे कोटी रुपये खर्च करून तुळजापूर शहरात विविध विकास कामे करण्यात येत आहेत़ या कामांतर्गतच एक असलेले अद्ययावत स्नानगृह होय! नवरात्रोत्सव, चैत्री पौर्णिमेसह सुट्ट्यांच्या कालावधीत तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे देवीदर्शनासाठी लाखो भाविक येतात़ या भाविकांना राहण्यासह स्नानाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते़ शिवाय मंदिरातील कुंडांमध्येही भाविकांची स्नानासाठी एकच गर्दी होत होती़ ही गर्दी टाळण्यासाठी बीडकर तलावात अद्ययावत स्नानगृह बांधण्यात येत आहे़ जवळपास ११ कोटी रूपये या स्नानगृहाच्या उभारणीसाठी खर्च करण्यात येत आहेत़ प्रगतीपथावर असलेल्या या स्नानगृहात दोन कुंडांची उभारणी करण्यात आली असून, विद्युतीकरणासाठीही प्राथमिक कामे झाली आहेत़ इथे महिला-पुरूषांसाठी स्वतंत्र दोन कुंड आहेत़ एका कुंडात मोठ्या कारंजे असून, परिसरात लॉकरचीही सुविधा करण्यात आली आहे़ भाविकांचे साहित्य ठेवण्यासाठी हे लॉकर उपयोगी ठरणार आहेत़ शिवाय वीस स्वच्छतागृही इथे उभारण्यात येत आहेत़ (वार्ताहर)
तुळजापुरात भाविकासाठी अद्ययावत स्नानगृह
By admin | Updated: September 15, 2014 00:26 IST