बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी येथील पालिकेवर नारळी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शहर दणाणून गेले.माळीवेस येथून दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात महिला, पुरुष व कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात नारळ व गळ्यात मनसेचे गमजे घालून मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. हा मोर्चा माळीवेसमार्गे अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे बीड पालिकेवर धडकला. यावेळी माजी आ. सुनील धांडे, नितीन धांडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखा फड, मनविसेचे जिल्हाप्रमुख शैलेश जाधव, राजू हंगरगे, उपजिल्हाप्रमुख संगीता चव्हाण आदी सहभागी झाले होते. माजी आ. धांडे म्हणाले, शहरात कोट्यवधी रुपयांची कामे केली;पण ही कामे दर्जाहिन आहेत. विकासकामांचा पैसा गुत्तेदारांच्या घशात घातला जात असल्यानेच शहरवासीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विमानतळ, रेल्वे, बायपास, वातानुकूलीत भाजीमंडई ही एकच कॅसेट क्षीरसागर वाजवत आहेत, असे टिकास्त्र त्यांनी सोडले. विकासाच्या नावाखाली बीडकरांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.यावेळी रेखा फड म्हणाल्या की, बीड पालिकेत कोणाचाच कोणाला पायपोस नाही. जसे पदाधिकारी तसे अधिकारी आहेत. त्यामुळे सामान्यांची कामे होत नाहीत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होते. काहींनी वेतनाचीवाट पाहत मृत्यूला कवटाळले, तरीही सत्ताधाऱ्यांना जाग येत नाही, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जाधव गरजले!मनविसेचे जिल्हाप्रमुख शैलेश जाधव यांनी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली. ते म्हणाले, पालिकेत मनमानी सुरु आहे. खड्डे, नाल्या, पथदिवे हे मुलभूत प्रश्नच सुटायला तयार नाहीत. विकासाच्या नावाखाली हुकूमशाही सुरु आहे. ही हुकूमशाही संपली पाहिजे असे सांगून क्षीरसागरांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
बीड पालिकेवर मनसेचा नारळी मोर्चा
By admin | Updated: September 5, 2014 00:57 IST