चेतन धनुरे , उदगीरकृषी उत्पन्न बाजार समितीचा सुभा ताब्यात घेण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या सोसायटी निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे़ त्यात उदगीरची रणभूमी चांगलीच तापली आहे़ येथील सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेऊन असणाऱ्या काँग्रेसींचे ‘पानिपत’ करुन त्यांना बाजार समितीच्या खिंडीत गाठण्यासाठी यावेळी भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी रणशिंग फुंकले आहे़ परंतु, पहिल्या टप्प्यातील कौल त्यांच्या मन‘सुभ्या’स धक्का देणारेच ठरले़वर्षानुवर्षे सहकाराची तटबंदी अभेद्य राखल्यानेच काँग्रेसने उदगीरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपली पकड मजबूत केली आहे़ ही बाब लक्षात घेत यावेळी भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी दीड वर्षांनी निवडणूक लागणारी उदगीरची बाजार समिती केंद्रस्थानी ठेवून सोसायट्यांना ‘लक्ष्य’ केले आहे़ उदगीर तालुक्यात पहिल्या टप्प्यात १९ सोसायट्यांच्या निवडणुका होत आहेत़ त्यापैकी बहुचर्चित व मोठ्या सोसायट्यांचे निकाल जाहीर झाले आहेत़ त्यात माजी आमदार चंद्रशेखर भोसले, बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, संचालक विठ्ठलराव मुळे यांच्या सोसायट्यांचा समावेश आहे़ आतापर्यंत सताळा बु़, लोहारा, डिग्रस, शेकापूर, सुकणी, शंभु उमरगा सोसायट्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत़ त्यापैकी शंभु उमरगा सोसायटीतील सर्वच सदस्य भाजपाचे निवडून आले़ तर सताळा बु सोसायटीत १३ पैकी ८ सदस्यांनी बाजी मारली़ सताळ्यातून भाजपाने सभापती हुडे यांच्या पॅनलला पराभूत केले़ परंतु, हुडेंचा पराभव ते करु शकले नाहीत़ दरम्यान, बाजार समितीतील काँग्रेसचे संचालक विठ्ठलराव मुळे यांनी सुकणी सोसायटी पूर्णपणे आपल्या ताब्यात राखली़ तसेच अनेकांचे लक्ष लागलेल्या डिग्रस सोसायटीतही माजी आमदार काँग्रेसचे चंद्रशेखर भोसले यांच्या पॅनलने सर्वच जागा खिश्यात टाकल्या़ शेकापूर सोसायटी बिनविरोध निघाली असून, त्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे़ लोहाऱ्यात संमिश्र कौल मिळाला आहे़ पहिल्या टप्प्यातील आतापर्यंतच्या या निकालांनी उदगीर बाजार समितीचा ‘सुभा’ आपल्या ताब्यात घेण्याचा मनसुबा आखलेल्या आमदार भालेराव यांना धक्काच दिला आहे़उदगीरच्या बाजार समितीत आपले वर्चस्व राखणाऱ्या माजी आमदार चंद्रशेखर भोसले व सभापती शिवाजी हुडे यांची बाजार समितीतील वाट रोखण्यासाठी भाजपाने पुरेपूर प्रयत्न केले़ ते निवडणूक लढवीत असलेल्या सताळा व डिग्रस सोसायटी प्रतिष्ठेची करीत आमदार भालेराव यांनी बैठकाही घेतल्या़ मात्र काँग्रेसचे चंद्रशेखर भोसले व शिवाजी हुडे हे दोघेही विजयी झाल्याने आमदार भालेरावांचे प्रयत्न फळले नाहीत़
आमदार भालेरावांच्या मन‘सुभ्या’स धक्का
By admin | Updated: February 10, 2015 00:30 IST