गेवराई मतदारसंघात दोन पंडितांमधील राजकीय वैर जिल्ह्याच्या राजकारणाला गेली पंचवीस वर्षापासून परिचित आहे. पंचायत समितीचे सभापतीपद काकांनी नाकारले म्हणून त्यांच्यापासून दुरावलेल्या बदामराव पंडित या त्यांच्या पुतण्याने स्वत:च्या बळावर आपले राजकीय करीअर घडविले. त्यानंतर काका शिवाजीराव पंडित आणि चुलत भाऊ अमरसिंह पंडित यांच्या विरोधातही बदामराव यांनी निवडणूक लढविली. बदामराव आणि अमरसिंह पंडित यांच्यातील राजकीय वैर वाढतच गेले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन पंडित मिळून प्रचारात उतरले आहेत. बदामराव पंडित हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. निवडणुकीत गोळाबेरीज करण्यासाठी सगळेच उमेदवार प्रयत्न करीत असतात. अशीच गोळाबेरीज आता दोन पंडितांनी केली असली तरी या दोन्ही पंडितांच्या कार्यकर्त्यांना मात्र हे पचनी पडले आहे की नाही, हे निवडणुकीनंतरच समोर येणार आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षात गेवराई करांना दोन पंडित एकाच पक्षासाठी एकाच मंचावर कधीही दिसलेले नाहीत. मात्र हे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेले आहे. यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघातून भाजपाकडून उभे असलेले अॅड. लक्ष्मण पवार यांच्या समोर आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानाला पवार कसे पेलतात हे पहाणे आवश्यक आहे. आज तरी दोन पंडित व पवार मतदार संघातील वाड्या, वस्त्या, तांड्यावर प्रचार करत असल्याचे पहावयास मिळत आहे. काय होईल ते मतदानाच्या नंतरच कळेल.
दोन पंडितांचे मनोमिलन
By admin | Updated: October 3, 2014 00:34 IST