उस्मानाबाद : शहरातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दाखल गुन्ह्यात ‘बीएचआर’ संस्थेचे संचालक जेरबंद करण्यात आले आहेत़ त्यामुळे आता तक्रारी करणाऱ्यांचा ओघ वाढला असून, आजवर २५ जणांनी ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत़ वाढत्या तक्रारी पाहता फसवणूक करून घोटाळा केल्याची रक्कम कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ दरम्यान, या प्रकरणात एका शाखा व्यवस्थापकालाही पोलिसांनी रविवारी जेरबंद केले़शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ़ पालकर यांनी ‘बीएचआर’ संस्थेच्या शहरातील शाखेत ठेवलेली ठेव वारंवार मागणी करूनही परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती़ या तक्रारीवरून २० डिसेंबर रोजी संस्थेच्या संचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या संस्थेच्या संचालकांनी फसवणूक केल्याची गुन्हे राज्यात अनेक ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत़ याच प्रकरणात जळगाव येथील कारागृहात असलेले संस्थेचे संचालक प्रमोद भाईचंद रासोयनी, मोतीलाल ओंकार गिरी, दिलीप कांतीलाल चोरडीया, सुरजमल बभुमल जैन, यशवंत ओंकार गिरी, शेख मजान अब्दुल नबी, इंद्रकुमार आत्माराम लालवानी, जितेंद्र यशवंत महाजन, भगवान हिरामन वाघ, राजाराम काशीनाथ कोळी, भागवत संपत माळी, दादा रामचंद्र पाटील या बारा जणांना शहर पोलिसांनी २५ मार्च रोजी ताब्यात घेतले होते़ या सर्वच संचालकांना २६ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ दरम्यान, संचालकांना जेरबंद करण्यात आल्याचे समजताच शहरासह ग्रामीण भागातील जवळपास २५ जणांनी शहर पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी दिल्या आहेत़ या सर्वांची रक्कम जवळपास ५० ते ६० लाखांच्या आसपास आहे़ येणाऱ्या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, हा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची आहे. (प्रतिनिधी)
कोट्यवधीचा घोटाळा !
By admin | Updated: March 30, 2015 00:40 IST