लातूर : खाजगी अनुदानित मान्यताप्राप्त शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जि.प.च्या आस्थापनेत समायोजन करण्याचा ठराव चर्चेविना कसा घेतला, असा सवाल करीत जि.प. सदस्य आक्रमक होत सभागृहाबाहेर पडले. जि.प. अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वॉक्आऊट् झालेल्या सदस्यांची तब्बल अर्धा तास मनधरणी केल्यानंतर सभागृह पुन्हा पूर्ववत सुरू झाले. नूतन जि.प. अध्यक्षांची निवड झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात पहिलीच सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रतिभाताई पाटील कव्हेकर होत्या. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती कल्याण पाटील, समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, बांधकाम सभापती सपना घुगे, महिला व बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची उपस्थिती होती. खाजगी अनुदानित मान्यताप्राप्त शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबतचा ठराव मागच्या इतिवृत्तात कसा आला. यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चाच नव्हती. तो कोणाच्या परवानगीने विषय पत्रिका व टिपण्णीमध्ये आला, असा भडिमार करीत युवराज पाटील, रामचंद्र मद्दे, रामचंद्र तिरुके, माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे आदी सदस्यांनी सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. दरम्यान, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी सभागृहाबाहेर येऊन या सदस्यांची दिलगिरी व्यक्त केली. सदस्यांना या विषयाची माहिती दिली होती, असा दावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला. तरीपण सभागृहाने या संदर्भात घेतलेला निर्णय मला मान्य राहील, असे सीईओंनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सभागृह पुन्हा सुरू झाले.बांधकाम विभागाने केलेल्या १०८ कामांची यादी दिली आहे. त्यातील १७० कामांची देयके अदा केली असून, त्यातील ६८ कामे संशयास्पद आहेत. बहुतांश रस्त्यांची असलेल्या या कामांवर एक खडाही टाकला नाही. मात्र बिले उचलली आहेत. साडेतीन लाखांचा घोटाळा या कामात झाल्याचा आरोप रामचंद्र तिरुके यांनी केला. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या दोन्ही समित्यांचा अहवाल सदनापुढे आला नाही. तो सभागृहात सादर करावा, अशी मागणी यावेळी तिरुके यांनी केली. मात्र याही सभेत अहवाल सादर होऊ न शकल्याने भाजपा सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)अध्यक्षांचे मिस्टर जि.प.च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात, असा प्रश्न सभागृहात भाजपाचे जि.प.तील गटनेते रामचंद्र तिरुके यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी जागेवर उभे राहून खुलासा करण्याचे मागणी केली. त्यावर जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली नव्हती. तर शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना मीच मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते. त्यामुळे ते मार्गदर्शनासाठी आले होते.जि.प.च्या विषय समित्यांवरील रिक्त सदस्यांच्या निवडीला सभागृहाने मान्यता दिली. कृषी व पशुसंवर्धन समितीवर बालाजी कांबळे, चंद्रकांत मद्दे, समाजकल्याण समितीवर बालाजी कांबळे, महिला व बालकल्याण समितीवर अक्षता साबळे, स्थायी समिती अशोक पाटील निलंगेकर, आरोग्य समिती दत्तात्रय बनसोडे, चंद्रकांत मद्दे यांची निवड करण्यात आली. यावेळी सभागृहाने या निवडीला मंजुरी दिली. यावेळी नवनिर्वाचित सभापती अण्णासाहेब पाटील, सपना घुगे, वेणूताई गायकवाड, सुलोचना बिदादा, कल्याण पाटील यांना पदभार दिला.सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी करपे हे जि.प. सदस्यांनी सांगितलेल्या कामांकडे दुर्लक्ष करतात. पत्र दिल्यानंतरही त्याची माहिती ते पुरवीत नाहीत. लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सभागृहात जि.प. सदस्य भारत गोरे यांनी केली. त्यांचा निषेध करण्याचा ठराव घ्यावा, असे गोरे यांनी सभागृहाला सांगितले. त्यावेळी जि.प. अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.श्री महात्मा बसवेश्वर यांचे आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे तैलचित्र जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लावण्याचा ठराव मागील सभेत घेण्यात आला होता. पुढील सभेपर्यंत तैलचित्र सभागृहात लावले जातील, असे आश्वासन जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी सदस्यांना उत्तर देताना दिले.
समायोजनावरून सदस्य वॉक्आऊट
By admin | Updated: October 31, 2014 00:35 IST