लातूर : जिल्ह्यात स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत़ त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत या आजाराचा तिसरा रुग्ण आढळला आहे़ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यास स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्याच्यावर सर्वोपचारमध्ये उपचार सुरु आहेत़विक्रम विलास शिंदे (२२, रा़ लातूर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे़ विक्रम शिंदे हा शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात असून तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतो़ तो सर्दी, खोकल्याने त्रस्त असल्याने त्याला उपचारासाठी सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले़ दरम्यान, त्याचा स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असता तो पॉझिटिव्ह आला आहे़ त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले़ दरम्यान, तो राहत असलेल्या वसतिगृहातील खोलीत अन्य आठ विद्यार्थी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावरही औषधोपचार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ यापूर्वी औसा तालुक्यातील देवताळा येथील विजय राठोड यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता़ तर गत आठवड्यात लहानेवाडी (ता़ रेणापूर) येथील एका बालिका या आजाराने त्रस्त होती़
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यास स्वाईन फ्लूची लागण
By admin | Updated: April 8, 2017 00:11 IST