औरंगाबाद : खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी महापौर कला ओझा यांची उशिरा येण्याच्या कारणावरून चांगलीच कानउघाडणी केली. चारचौघांत आमदार, नगरसेवक , मनपाचे अधिकारी व कार्यकर्त्यांसमक्ष भरचौकात झालेल्या अपमानामुळे महापौरांना रडू कोसळले. आ. प्रदीप जैस्वाल यांनी त्यांची समज काढल्यानंतर त्या शांत झाल्या.एन-८ येथील बॉटनिकल उद्यानाचे नामकरण शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल उद्यान असे करण्यात आले. नगरसेविका प्राजक्ता भाले, मंगेश भाले यांनी आयोजित के लेल्या त्या कार्यक्रमास सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, त्र्यंबक तुपे, अनिल जैस्वाल आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाची वेळ ४ वाजेची होती. खा.खैरे हे ४.३० वा. पोहोचले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महापौर ओझा होत्या. परंतु त्या आलेल्या नव्हत्या. त्यामुळे खा.खैरे संतापले. त्यांनी उद्यान नामकरण फलकाचे अनावरण आटोपले. त्यानंतर छोटेखानी सत्काराचा कार्यक्रमही सुरू झाला. तरीही महापौर आलेल्या नव्हत्या. खा.खैरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी महापौर तेथे आल्या. खा.खैरे यांनी महापौरांचा भाषणातच समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचे नाव उद्यानासाठी द्यायचे आहे. त्या कार्यक्रमाला पदाधिकारी उशिरा येतात. शिवसेनाप्रमुखांमुळे आपण घडलो. सत्तेत आलो आहोत, याचा त्यांना विसर पडला आहे. ज्यांच्यामुळे लालदिवा, सत्ता मिळाली. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमांना उशिरा येणे योग्य नाही. भाषणानंतरही खा.खैरे यांनी महापौरांची चांगलीच कानउघाडणी केली. सर्वांसमक्ष खा.खैरे यांनी संतापून वरच्या आवाजात घेतलेला खरपूस समाचार महापौरांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. आ.जैस्वाल यांनी समजावून सांगितल्यानंतर त्या शांत झाल्या आणि तातडीने निघून गेल्या. कार्यक्रम झाल्यानंतर या घटनेची चर्चा शहरभर पसरली. याप्रकरणी महापौरांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. ही दुसरी घटना मार्च महिन्यात पालिका प्रशासनाने बड्या थकबाकीदारांकडून जोरदार कर वसुली मोहीम सुरू केली होती. हितचिंतकांचे नुकसान होत असल्यामुळे खा.खैरे यांनी महापौरांचा चारचौघांमध्ये पानउतारा केल्यामुळे त्या अक्षरश: रडल्या होत्या. समर्थनगर येथील जिल्हा शिवजयंती उत्सव समिती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी घडलेल्या त्या प्रकारामुळे शहरभर उलटसुलट चर्चा होती. शिवाय महिला महापौरांना भरचौकात रडण्यापर्यंत बोलणे योग्य आहे काय? यावरून तर्कवितर्क लढविले गेले होते. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापौरांचा अपमान होण्याची ही दुसरी घटना आहे.
महापौर ढसाढसा रडल्या
By admin | Updated: September 5, 2014 00:53 IST