औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या बसगाड्यांवर ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ असे लिहिले आहे. मात्र, हे फक्त लिहिण्यापुरतेच राहिले आहे. कारण, प्रत्यक्षात एसटीत मास्क न लावलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. शिवाय, अनेक बसमध्ये तर स्वत: चालक-वाहकच विनामास्क दिसतात. त्यामुळे कोरोना आणि मास्कचा सर्वांना विसर पडला आहे. ही बाब कोरोना प्रादुर्भाव वाढीला हातभार लावणारी ठरू शकते. त्यामुळे याकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी पाहणी केली असता एसटीत आणि फलाटावर विनामास्क प्रवाशांसह चालक-वाहक पाहायला मिळाले. ही परिस्थिती पाहता कोरोना संपला का, असा प्रश्न पडतो. विनामास्कच चालक-वाहकांच्या चर्चा सुरू होती. स्टेअरिंगवर बसलेले अनेक चालक, प्रवाशांना तिकीट देणारे अनेक वाहकही विनामास्क पाहायला मिळाले. बसमध्ये विनामास्क चढणाऱ्या प्रवाशांना कोणीही रोखत नव्हते. बसच्या प्रतीक्षेत बाकड्यांवर बसलेले प्रवासीही विनामास्क होते. अनेकांनी केवळ नावालाच मास्क घातला होता. कुणाचा हनुवटीवर, कोणाचा तोंडावर तर कोणाचा मानेवर मास्क होता. यासंदर्भात विचारणा केल्यानंतर मास्क घालण्यास अनेकांनी प्राधान्य दिला.
१) दररोज मास्क घालण्यास प्राधान्य देतो. परंतु, आज मास्क घरीच विसरलो, त्यामुळे मास्क घातलेला नाही. परंतु, आता गळ्यातील रुमाल मास्क म्हणून लगेच लावणार आहे. मास्क किती गरजेचा आहे, हे माहीत आहे. स्वत:सह इतरांसाठी प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे.
- मास्क न घातलेला चालक
२) मास्क सोबतच आहे. पण मास्क घालण्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. ही चूक मी मान्य करतो. लगेच मास्क घालतो. यापुढे असे होणार नाही. प्रत्येकाने निश्चितच मास्क वापरला पाहिजे.
- मास्क न घातलेला प्रवासी
३) तुम्ही कशाला विचारणा करता. तुम्ही छायाचित्रही घेऊ नका. तुम्हाला कुठे जायचे असेल तर एसटीत बसा. तुम्ही आम्हाला काहीही विचारू शकत नाही.
-मास्क न घातलेला चालक