जालना : मारवाडी समाजाने उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेऊन जालन्याचे नाव देशातच नव्हे, तर जगभरात पसरवले आहे. हा समाज अर्थपूर्ण आणि दानशूर आहे. संकटकाळात नेहमी मदतीचा हात पुढे करणारा मारवाडी समाज जिल्ह्याचे भूषण असल्याचे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी काढले.येथील रुख्मीणी गार्डनमध्ये रविवारी सायंकाळी अखिल भारतीय मारवाडी युवा मंच व अखिल भारतीय वर्षीय मारवाडी संमेलनच्या जालना शाखेच्या वतीने आयोजित आत्मीय अभिनंदन समारोह व पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री राजेश टोपे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. जयप्रकाश मुंदडा, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, मनोज महाराज गौड, सुखलाल कुंकुलोळ, वीरेंद्र धोका, संजय दाड, रमेशचंद्र तवरावाला आदींची उपस्थिती होती. खा. दानवे पुढे म्हणाले की, जालन्यात मारवाडी समाजाने अनेक उद्योगांमध्ये एक विशिष्ट उंची गाठलेली आहे. व्यापारीपेठ म्हणून जालन्याची ओळख सर्वत्र झालेली आहे. त्यामुळेच आता ड्रायपोर्ट प्रकल्प जालना शहरापासून जवळच असलेल्या दरेगाव येथे उभारण्यात येत आहे. वर्धा व जालन्याचे ड्रायपोर्ट एकमेकांशी जोडले जाणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले. पालकमंत्री लोणीकर म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळात जनावरांसाठी चारा छावण्या, ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पुरविण्याचे काम मारवाडी समाजाने केलेले आहे. शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे प्रकल्प आणून बेरोजगारीचा प्रश्न तसेच उद्योजकांचे प्रश्न सोडविले जातील. आगामी काळात वीज निर्मितीचा प्रकल्पही सुरू करण्यात येणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. माजी मंत्री तथा आमदार टोपे यावेळी म्हणाले की, मारवाडी समाज हा केवळ व्यवसायातच नव्हे तर गरीबांप्रती आपुलकी ठेवून त्यांना मदत करण्यातही पुढे आहे. या समाजाने जालन्याची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सध्या उद्योगांमध्ये हा समाज अडचणीत सापडला असून राज्य सरकारने त्यासाठी मदतीची पाऊले उचलावीत, असे आवाहन आ. टोपे यांनी केले. आ. खोतकर म्हणाले की, मारवाडी समाज हा देशाला आर्थिक बळ देणारा समाज आहे. या समाजातील व्यक्तींनी इतर घटकांनाही सोबत घेऊन काम केलेले आहे. समाजासमोर आदर्श घडविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे, अशी अपेक्षा आ. खोतकर यांनी व्यक्त केली. आ. मुंदडा, माजी आ. जेथलिया यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. यात अध्यक्ष श्याम लखोटिया, सचिव चेतन बोथरा व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात किशोर अग्रवाल (जालना भूषण), कैलास लोया, समीर अग्रवाल व परेश रूणवाल (उद्योग भूषण), हिरादेवी धोका, सोहनलाल गोयल, राधेश्याम अग्रवाल, पद्माताई भरतिया, सी.ए. गोविंदप्रसाद मुंदडा, हस्तीमल बंब, अॅड. संजीव काबरा, डॉ. राजकुमार सचदेव (समाजभूषण), विष्णूकुमार चेचाणी, डॉ. मनिष राठी, गणेश अग्रवाल, संगीता मुंदडा, पुरूषोत्तम जयपुरीया, पुरूषोत्तम मोतीवाला, बाबूलाल जोशी, रवि कोंका, प्रिया सूरडकर (समाजरत्न) आदींना गौरविण्यात आले.
मारवाडी समाज जिल्ह्याचे भूषण
By admin | Updated: April 7, 2015 01:19 IST