फुलंब्री : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लवकरच बाजारपेठ सुरू होणार असून शेतकर्यांसाठी शेतकरी भवन बांधकामाचा शुभारंभही करण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक सभापती संदीप बोरसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात येणार्या काळात विविध विकासात्मक कामे करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आले आहेत. बाजार समितीच्या आवारात व्यापारी व आडत गाळे बांधण्यात आलेले आहेत. यात बाजारपेठ सुरू करण्यासाठी अंतर्गत रस्ते बनविणे, स्ट्रीट लाईट लावणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही कामे तात्काळ हाती घेण्यात येणार आहेत, तसेच शेतकरी भवन बांधण्याच्या कामाचा शुभारंभ लवकरच होणार आहे. या शिवाय वडोदबाजार व निधोना येथे गोडाऊन बांधणे, वजन काटा सुरू करणे, येणार्या खरीप हंगामात शेतकर्यांना रासायनिक खते उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीमार्फत राबविल्या जाणार्या विविध योजनांची माहिती प्रत्येक गावात पोहोचविण्यासाठी सोसायटी सदस्यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. बाजार समिती ‘क’ वर्गात होती ती आता ‘ब’ वर्गात आलेली आहे. येणार्या काळात अ वर्गात येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती संदीप बोरसे, उपसभापती सुभाष गायकवाड यांनी सांगितले.
फुलंब्रीत लवकरच बाजारपेठ सुरू होणार
By admin | Updated: May 26, 2014 01:13 IST