औरंगाबाद : मनपातील कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर रोजी वेतन करण्यात आले. ११ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम पालिकेने अदा केली. मात्र, यंदा दिवाळीला बोनस मिळण्याबाबत अजून अनिश्चितता आहे. निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर बोनस देण्याबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. आयुक्त प्रकाश महाजन हे हरियाणा येथे निवडणूक निरीक्षक म्हणून गेले आहेत, तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. प्रशासनही निवडणुकीत ड्यूटीवर आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विचार २१ आॅक्टोबरनंतर होणार आहे. दिवाळी सणाला बोनस देण्याबाबत लेखा विभागाला सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ३१ आॅगस्टपर्यंत ३२ कोटी रुपये ठेकेदारांचे, तर सप्टेंबरमधील वेतन आणि कर्जहप्ते व समांतरची देणी मिळून ५६ कोटी रुपये मनपाला लागणार आहेत. त्यातच बोनस व अग्रीम मिळून अंदाजे अडीच कोटी रुपये जास्तीचे लागणार आहेत. ११ कोटी ५० लाख रुपये वेतन अदा करण्यात आले. गेल्या दिवाळीला चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांचा सुट्यांचा मोबदला व २ हजार ४१९ रुपये सानुग्रह अनुदानापोटी, असे मनपाने अडीच कोटी रुपये दिले होते.
मनपाचे वेतन झाले; बोनसबाबत अनिश्चितता
By admin | Updated: October 2, 2014 01:04 IST