लातूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला डीपी रोडसाठी १९९०-९१ मध्ये संपादित करण्यात आलेल्या दीड एकर जमिनीचा मोबदला अद्यापही देण्यात आला नसल्याने ९२ लाख रुपयांसाठी न्यायालयाने मनपाच्या साहित्य जप्तीचे आदेश बजावले आहेत़ दरम्यान, जप्तीसाठी बीलिफ घेऊन आलेल्या सदस्यांना मार्च एण्डपर्यंत ९२ लाख ७४ हजार ९७३ रुपये दिले जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याने जप्तीची कारवाई टळली.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील हमीद अलीखान कायमखानी यांची जमीन डीपी रोडसाठी संपादित केली होती़ मावेजा दिला नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. २०११ साली याचिकाकर्त्याला नगरपालिकेने ९२ लाख ७४ हजार ९७३ हजार रूपये द्यावेत, असा आदेश दिला़ तेव्हापासून ते आजवर कायमखानी यांच्या वारसदारांनी पैशाची मागणी केली परंतु, प्रत्येकवेळी आश्वासन मिळत गेले़ महापालिका पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने याचिकाकर्त्यांनी लातूरच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली़ सर्व प्रकरणाची शहानिशा करून न्यायालयाने मनपाच्या खुर्च्या, टेबल, कपाट, संगणक आदी प्रत्येकी १०० वस्तू व एक कार जप्त करण्याचा आदेश दिला़ न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यासाठी बिलीफ आऱडी़ कांबळे बुधवारी दुपारी मनपात आले़ यावेळी त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. अर्धा तासाची वेळ घेतलेल्या आयुक्तांनी निम्मे पैसे आता देऊ उर्वरित नंतर असे सांगितले, पंरतु, याचिकाकर्त्यांना ते मान्य झाले नाही़ शेवटी मार्च एण्डपर्यंत सर्व रक्कम एकाचवेळी दिली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यामुळे जप्तीची कारवाई टळली. (प्रतिनिधी)
मनपावर साहित्य जप्तीची नामुष्की !
By admin | Updated: March 19, 2015 00:17 IST