जालना : शहरातील मुख्य मार्गांसह विविध रस्त्यांची वाट लागली आहे. जुन्या रस्त्यावर खड्डे तर आहेतच नवीन रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. एकूणच या स्थितीमुळे खड्डयांत हरवले रस्ते म्हणण्याची वेळ आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल सुरुच आहेत. असे असले तरी पालिकेला याचे काही एक सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. पालिकेच्या गलथान कारभाराचा परिणाम आम्हाला भोगावा लागत असल्याची भावना अनेक नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. सुभाष चौक ते महावीर चौक, अग्रसेन चौक ते बसस्थानक, अण्णा भाऊ साठे चौक ते विठ्ठल मंदिर, औरंगाबाद रोड, अग्रसेन चौक ते बालाजी चौक आदी प्रमुख रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. शहरात दीड वर्षांपूर्वी आठ कोटी रुपये खर्च करुन रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. काही रस्त्यांवर पालिकेने पुन्हा पॅचअप केले. तरीही रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य कमी झाले नसल्याने हे खड्डे कुणाच्या हिताचे, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे. नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, पावसाळ्यानंतर शहरात काही ठिकाणी नवीन रस्ते तसेच खड्डे पडलेल्या रस्त्यांचीही दुुरुस्ती करण्यात येणार आहे.शहरात नवीन रस्ते तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करणार आहोत. पावसाळ्यामुळे कामे सुरु करण्यास अडचणी येत आहेत. पावसाळा संपताच दर्जेदार रस्ते तयार करण्यात येतील. - पार्वताबाई रत्नपारखे, नगराध्यक्षा, जालना
खड्ड्यांत हरवले रस्ते!
By admin | Updated: August 7, 2015 01:13 IST