महाविद्यालयातील एका तरुणीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या तरुणाला दामिनी पथकाने चांगलाच चोप दिला. नंतर मुलीने सहानभूती दाखवीत तक्रार देण्यास नकार दिल्याने तरुणाची समज देऊन सुटका करण्यात आली. त्याचे झाले असे की, पोलीस आयुक्तालयाचे दामिनी पथक दुपारी देवगिरी महाविद्यालयात आले होते. त्याचवेळी एक तरुणी या पोलीस पथकातील कर्मचाऱ्याकडे आली आणि ‘तो बघा तो मुलगा माझ्याकडे सतत वाईट नजरेने पाहतो, मला त्रास देतो’ अशी तिने तक्रार केली. लगेच पथकाने ‘त्या’ तरुणाला पकडले. चांगलाच चोप देत त्याला पोलीस जीपमध्ये बसविले. ३या तरुणाला ही शिक्षा मिळाल्यानंतर मात्र तक्रार करणाऱ्या तरुणीने सहानुभूती दाखवीत त्या तरुणाविरुद्ध तक्रार करण्यास नकार दिला. नंतर पोलिसी भाषेत समज देऊन दामिनी पथकाने त्याला सोडले. देवगिरी महाविद्यालयातील एक प्राध्यापक माझ्या बहिणीची छेडछाड करीत आहे, तिला सध्या तो त्रास देत आहे, असा एक फोन दुपारी एका जणाने पोलीस नियंत्रण कक्षात केला. त्यानंतर लगेच दामिनी पथक तेथे पोहोचले. फोन करणाऱ्याने त्या प्राध्यापकाचे व स्वत:च्या बहिणीचे नावही सांगितले होते. या पोलीस पथकाने महाविद्यालयात पोहोचल्यानंतर तपास केला असता ज्या प्राध्यापकाविरुद्ध तक्रार होती, ते प्राध्यापक सुटीवर असल्याचे आणि ज्या मुलीचे नाव सांगण्यात आले होते, ती मुलगी तिच्या घरी असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय त्या मुलीने माझा असा कुणी भाऊ नाही व त्याने फोनही केला नाही, असा खुलासा पोलिसांकडे केला. तेव्हा ती तरुणी आणि प्राध्यापकाला त्रास देण्याच्या हेतूने हा निनावी फोन केल्याचे स्पष्ट झाले.
तरुणीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला चोपले!
By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST