औरंगाबाद : येणाऱ्या काळात देशाला ‘सीए’ची अधिक गरज भासणार आहे. त्यासाठी वाणिज्य शाखेतील करिअरची उत्तम संधी म्हणून ‘सीए’कडे पाहावे, असे मत प्रसिद्ध ‘सीए’ मेधा पांडे यांनी व्यक्त केले.
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय आयोजित व्यवसाय मार्गदर्शन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मेधा पांडे यांनी गुंफले. त्यांनी ‘सीए : एक करिअर संधी’ या विषयावर ‘आयसीएआय’ या संस्थेची माहिती, ‘सीए’चा अभ्यासक्रम, ‘सीए’ची कार्यक्षेत्रे व त्यासाठी लागणारी कौशल्ये आदींबाबत सादरीकरणाद्वारे सखोल मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर, उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. नागेश अंकुश यांनी केले.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प पराग राणे यांनी गुंफले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘सीएमए’ क्षेत्राची माहिती देऊन या क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटांची माहिती दिली. या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींची उदाहरणे देत कौशल्ये विशद केली. या कार्यक्रमासाठी विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.