जालना : जिल्ह्यातील पाचही मतदार संघात मतदानाचा टक्का अनपेक्षित वाढल्याने उमेदवारांसह राजकीय क्षेत्रातील जाणकार व गावोगावचे तर्कशास्त्रीसुद्धा गोंधळून गेले आहेत.दरम्यान, कोण निवडून येईल याची खात्रीच देता येईनासे झाले असून, त्यामुळे प्रत्येक जण सावध भूमिकेत गेले आहेत.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणुकीचा रणसंग्राम रंगला होता. कोण निवडून येणार, कोणाची विकेट पडणार यावर चांगलेच तर्क वितर्क लावले जात आहेत. यासाठी काहीजण बाबा, बुवांचाही आधार घेत जात आहे. विजयासाठी ठिक ठिकाणी पूजापाठ जोरात सुरु झाले आहेत. १५ आॅक्टोबर रोजी मतदान पार पडले. पाचही विधानसभा मतदार संघात प्रमुख पक्षांच्या मात्तबरांसह काही अपक्षांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. केलेली विकास कामे व जनतेची साथ यावर आपण निवडून येणार असा होरा बांधत आहेत. काही तर्कशास्त्रींनी तर उमेदवारांचा क्रमही लावला आहे. काही उत्साही कार्यकर्तेही तर्कशास्त्री बनले आहेत. त्यांनीच तर्कावर अधारित भविष्यवणी सुरु केली आहे. परंतु ठोस असे कोणीच सांगण्यास अथवा बोलण्यास तयार नाही. प्रत्येकजण जर तरची भाषा वापरुन काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे यापैकी कोण गती घेणार, कोण कोणचा वेध घेणार, कोणाचे काटे उलटे फिरणार यावर शहरासह ग्रामीण भागात विविध तर्कटे लढविली जात आहेत.निकाल रविवारी असला तरी मतदानाच्या टक्केवारीवरुन अनेकांनी बुथनिहाय अंदाज घेणे सुरु केले आहे. पाचही विधानसभा मतदार संघात पंचरंगी तसेच बहुरंगी लढती झाल्या. यावरुन अंदाज काढणे अवघड असले तरी काहींनी जात फॅक्टर, संघटना, समाजकार्य, उमेदवारांची पसंती यावरुन ढोबळ तर्क काढणे सुरु केले आहे. नुसत्या हवेवर तर्क वितर्कांना जोर आला आहे. ग्रामीण भागातील मंदिरे, पार, शेती वस्त्यांवर तर्कावर अधारित चर्चा रंगात आल्या आहेत. जो तो तर्कशास्त्री बनून हेच निवडून येणार असा दावा ठोकत आहेत. (प्रतिनिधी)
गावोगावचे तर्कशास्त्रीही गोंधळावस्थेत
By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST