औरंगाबाद : संलग्नीकरण समितीने अपात्र ठरविलेल्या १८ महाविद्यालयांना केवळ विद्यापीठाच्या चुकीमुळे यंदा जीवदान मिळाले. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्या परिषदेच्या बैठकीत त्या अपात्र महाविद्यालयांना यंदाचे संलग्नीकरण देण्याचा निर्णय झाला.मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीलाच महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाच्या मुद्यावर चर्चा सुरू झाली. संलग्नीकरण समितीने विद्यापीठाच्या अधिपत्याखालील १८ महाविद्यालयांना भेटी देऊन पाहणी केली होती. त्यावेळी संबंधित महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षक, प्राचार्य व अन्य घटकांची मोठी वानवा दिसून आली. त्यामुळे या समितीने सदरील १८ महाविद्यालयांना विद्यापीठाच्या संलग्नीकरणासाठी अपात्र ठरविले होते. मंगळवारी विद्या परिषदेच्या या बैठकीत सदरील महाविद्यालयांचा प्रश्न चर्चेला आला. तेव्हा काही सदस्यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या लक्षात आणून दिले की, आजची ही विद्या परिषदेची बैठक नियमानुसार मे महिन्यात घेतली पाहिजे होती. त्या बैठकीत सदरील अपात्र महाविद्यालयांना १ महिन्याच्या मुदतीची कारणे दाखवा नोटीस बजवायला हवी होती. त्यांच्याकडून नोटीसचा खुलासा मिळाल्यानंतर विद्या परिषदेने त्याबाबत निर्णय घेतला असता; पण तसे झाले नाही. आज ८ जुलै रोजी विद्या परिषदेची बैठक होत आहे. सध्या या महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत सदरील महाविद्यालयांना विद्यापीठाने संलग्नीकरण नाकारले, तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे अपात्र महाविद्यालयांना यंदा संलग्नीकरण देण्यात आले. तीन महाविद्यालयांना कायमस्वरूपी विद्यापीठाचे संलग्नीकरण मिळाले. एका महाविद्यालयास आजच्या बैठकीत संलग्नीकरण नाकारले. याशिवाय आजच्या या बैठकीत महाविद्यालयांच्या संलग्नीकरण समितीवर कोण असावे, यावर बराच खल झाला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या संलग्नीकरण समितीवर त्याच विषयाचे प्रोफेसर यापुढे नियुक्त केले जातील. आतापर्यंत विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांच्या तपासणीसाठी वाणिज्य विषयाचे तज्ज्ञ प्रोफेसर जात असत. यापुढे असले प्रकार टाळले जातील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. चोपडे यांनी दिली.सात संशोधन केंद्रांना मंजुरीयापुढे मागेल त्या महाविद्यालयांना संशोधन केंद्राची खिरापत वाटली जाणार नाही. संशोधनासाठी त्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा, महाविद्यालयात संशोधनासाठी पोषक वातावरण व अन्य बाबी तपासणीसाठी कुलगुरूंच्या नियंत्रणाखाली विशेष समिती स्थापन केली जाईल. ही समिती मागणी करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन पाहणी करील. समितीने दिलेल्या अभिप्रायानुसार संबंधित मागणी करणाऱ्या महाविद्यालयांना संशोधन केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली जाईल. आजच्या या बैठकीत ८ महाविद्यालयांना संशोधन केंद्र सुरू करण्याची मान्यता देण्यात आली.
अपात्र महाविद्यालयांना जीवदान
By admin | Updated: July 9, 2014 00:51 IST