जालना : जात-धर्माच्या पलिकडे जाऊन मानव म्हणून जगता आले पाहिजे. त्याचबरोबर समतेकडे नेणारे जीवन जगण्यास शिकले पाहिजे, तरच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.राजर्षी शाहू महाराज यांची जयंती राज्य शासनातर्फे दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्स साधून येथील डॉ. बाबासाहेब अांबेडकर सामाजिक न्याय भवनात जिल्हा समाज कल्याण कार्यालयातर्फे मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. लुलेकर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिती अधिकारी यशवंत भंडारे हे उपस्थित होते.राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक न्यायांच्या कामांचा, राबविलेल्या योजनांचा आणि त्यांनी कृतीतून व्यक्त केलेल्या विचारांचा परामर्श घेताना प्रा. लुलेकर यांनी शाहू महाराजांची दृष्टी भविष्याचा वेध घेणारी होती. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शिक्षणाच्या सक्तीचा कायदा केला. एवढेच नव्हे, तर ७०० ते एक हजार लोकवस्तीच्या प्रत्येक गावात शाळा सुरू केली. सामुहिक शिक्षणाची सुरूवात करून एकाच शाळेत दलितांपासून सर्व समाजाच्या मुलांना एकत्र शिक्षण घेण्याची सक्ती केली. त्यामुळे जातीयतेची प्रथा सैल होण्यास मदत झाली. एवढेच नव्हे, तर कोल्हापुरात सर्व जातींच्या मुलांसाठी २४ वसतिगृहे सुरू केली.
समतेकडे नेणारे जीवन जगावे- लुलेकर
By admin | Updated: June 29, 2014 00:43 IST