अजय चव्हाण, बीडएकीकडे भारतीय यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले असताना लोकांचे प्रश्न सोडविणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब जोखण्यासाठी ज्योतिषी, कुंडली जाणकारांकडे खेटे वाढवत आहेत. यावरुन भारतातील दोन टोकाच्या दोन प्रवृत्ती पहावयास मिळत आहेत. राजकीय भविष्यकारांकडे बीड जिल्ह्यातील उमेदवारांनी आपल्या चकरा वाढविल्या असून, नशीबाची साथ मिळावी, यासाठी ज्योतिषांच्या सल्ल्यानेच बहुतांश कृती करताना दिसत आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांनी राजकारणातील आपले भविष्य बदलण्यासाठी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार आपल्या नावात, आपल्या पेहरावात, राहणीमानात बराचसा बदल केला आहे. असे अनेक किस्से चर्चिले गेले आहेत. राजकीयदृष्ट्या पुढारलेला बीड जिल्हाही यात मागे असेल तरच नवल. फॅमिली डॉक्टर असतात तसे राजकारण्यांचे ‘फॅमिली’ राजकीय ज्योतिषकार ठरलेले आहेत. शुभा-अशुभ गोष्टीवर बीड जिल्ह्यातील उमेदवारांचा मोठा विश्वास हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रसंगावरुनच दिसते. जोपर्यंत पितृ पंधरवाडा होता तोपर्यंत एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. मात्र पितृ पंधरवाडा संपताच अर्ज भरण्यासाठी एकच उडी पडली. ज्योतिषकार, कुंडली जाणकार, गृहदशा जाणणारे अशा भविष्यकारांकडे जिल्ह्यातील राजकारणी नेहमी जात असतात. निवडणुकीच्या काळात या चकरा वाढल्या आहेत. कोणते वाहन वापरावे? कोणता रंगाचा वेश परिधान करावा? याचे बारीकसारीक सल्ले नेते मंडळी पाळताना दिसत आहेत. रत्नाची पारख असणाऱ्यांनाही निवडणुकीच्या धामधुमीत मोठा भाव आला आहे. राष्ट्रवादीच्या एका मातब्बर नेत्याने निवडणूक अर्ज भरल्या दिवसापासून ‘पवळ्या’ रत्नाची अंगठी घालण्यास सुरुवात केली आहे. घरातून निघताना बऱ्याच जणांनी उजवा पाय टाकूनच घर सोडावे, या ज्योतिषांच्या सल्ल्याचा अवलंब केला आहे, असेही एका भाजपा नेत्याच्या समर्थकाने सांगितले. अनेक उमेदवारांनी, त्यांच्या मंडळींनी व्रतवैकल्येही सुरू केले आहेत. काही उमेदवारांच्या अर्धांगिणींनी तर वेगवेगळ्या मंदिरात जाऊन नवससायासही केले आहेत. निवडणुकीपूर्वी काही इच्छुक उमेदवारांनी तर सपत्नीक धार्मिक विधी करुन गृहदोष सुधारण्याचा प्रयत्नही केला आहे. नेत्यांच्या अशा या श्रद्धा, अंधश्रद्धेमुळे त्यांच्या समर्थकांवरही या गोष्टींचा मोठा प्रभाव पडत आहे. असे असले तरी शेवटी कार्य, निवडणुकीचे नियोजन, व्यक्तिमत्व, मतांचा जुगाड याच गोष्टी उमेदवारांना निवडणुकीत तारू शकतात हे ते उमेदवारही जाणून आहेत हे विशेष !
नेत्यांच्या ज्योतिषांकडील चकरा वाढल्या !
By admin | Updated: October 5, 2014 00:49 IST