आशपाक पठाण , लातूरलातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा अपुरा पडत आहे़ गेल्या पाच वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे़ विकासाच्या मार्गावर असलेल्या शहराला पाणीटंचाई बाधा ठरत आहे़दरवर्षी पाण्यासाठी ओरड होत असल्याने यंदा महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी ३३४ कोटींचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़ मात्र, जवळपास ९० किलोमीटरची योजना पुर्णत्वास येणार की नाही? यावर शंका व्यक्त केली जात आहे़पाणीटंचाईमुळे शहराच्या विकासाची गती थंडावलेली आहे़ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तारांबळ सुरू आहे़ ५ लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यातही शहराला आठवड्यातून एकवेळा पाणीपुरवठा करण्यात आला आहे़ आता महिन्यातून एकवेळा पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने लातूरच्या पाणीप्रश्नांवर प्रशासन यावर्षी सतर्क झाले आहे़ त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनाही यावर्षी टंचाईच्या झळा लागल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ मात्र, लोहा तालुक्यातील लिंबोटी येथून जवळपास ९० किलोमीटरचे अंतर असलेल्या या योजनेचा प्रस्ताव पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवाकडे १४ जुलै रोजी पाठविण्यात आला आहे़ सध्या मनपा व एमजेपीने कच्चा आराखडा तयार प्रस्ताव दिला असून राज्य शासनाकडून यावर काय निर्णय त्यावर पुढील भूमिका ठरणार आहे़ लातूर शहराची भविष्य काळातील गरज पाहता सदर पूरक पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान किंवा केंद्र शासनाच्या योजनेतून मंजूर करावा, अशी मागणी केली आहे़ तीन वर्षांपासून टंचाईच्या झळा़़़लातूर शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन विविध टप्प्यात योजना राबविण्यात आल्या आहेत़ त्यात साई व नागझरी येथील मांजरा नदीवरील बंधाऱ्यावरून २००५ मध्ये योजना कार्यान्वित करण्यात आली़ मांजरा धरण क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही़ परिणामी, लातूरकरांना पाण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात भटकंतीची वेळ आली आहे़ नळाला येणारे पाणी अपुरे असल्याने विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे़ तीन वर्षांपासून झळा सहन करणाऱ्या लातूरकरांना आता मात्र लिंबोटीचा झरा दाखविण्यात येत आहे.
नुसतीच अपेक्षा..लातूर शहरासाठी शाश्वत व शहराची पाण्याची गरज लक्षात घेता मोठ्या क्षमतेचा व नजीकचा पर्याय म्हणून लिंबोटी जलसिंचन प्रकल्पाशिवाय मनपाकडे पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही़ त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ लिंबोटीच्या पाण्यावर लातूरकरांनी आस ठेवली आहे़ मात्र, प्रकल्पाला शासनाची मान्यता मिळणे व त्यानंतर नांदेडकरांकडून होकार मिळणे, यावर प्रकल्पाचे भविष्य अवलंबून आहे़ सध्या तरी प्रशासनाने लातूरकरांना लिंबोटीच्या पाण्याची आस दाखविली आहे़