लातूर : यंदा पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी प्रवेशपूर्व पात्रता परीक्षेतही लातूरने आपली पताका फडकाविली आहे. २५ मे रोजी देशपातळीवर घेण्यात आलेल्या आयआयटी-जेईई अॅडव्हॉन्स्ड परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या निकालात चमकदार कामगिरी करीत लातूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटविली आहे. जवळपास ३२ विद्यार्थी या परीक्षेत उत्कृष्ट रँकने यशस्वी होऊन देशभरातील १७ नामांकित आयआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशास पात्र ठरले आहेत. आयआयटीच्या ९७८४ जागांसाठी देशभरातून तब्बल दीड लाख विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हॉन्स्ड परीक्षा दिली होती. लातुरातील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे तब्बल २९ विद्यार्थ्यांना आयआयटी महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. याशिवाय, मिलिंद महाविद्यालयातील दोन तर श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यास आयआयटीत प्रवेश मिळू शकतो. मयूरचे स्वप्न साकारले... अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील मयूर बांगर या विद्यार्थ्याचे स्वप्न अखेर साकारले आहे. मूळचा हिंगोलीचा मयूर प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत आहे. वडील केशवराव आजाराने अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे कुटुंबाची सगळीच जबाबदारी आई विद्या यांच्यावर आहे. त्यांनी परिस्थितीशी दोन हात करीत घरातच साड्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून मिळणाऱ्या जेमतेम रकमेतून उदरनिर्वाह व मयूरचे शिक्षण सुरू आहे. मयूरने वैद्यकीय सीईटीतही ५५७ गुण मिळविले होते. परंतु, त्याची इच्छा आयआयटीयन बनण्याची होती. त्याने जेईई अॅडव्हॉन्स्ड परीक्षा देऊन ओबीसी प्रवर्गातून ३१२ वा रँक मिळवीत स्वप्न साकारले आहे.लातूरचा ‘प्रखर’ चमकला...मूळचा लातुरातील प्रखर अग्रवाल याने हैैदराबादमधून परीक्षा देत जेईई अॅडव्हॉन्स्ड परीक्षेत ‘प्रखर’ यश मिळविले आहे. त्याने देशपातळीवर ६४ वा रँक मिळवून लातूरच्या शिक्षणाचा ‘बेस’ पक्का असल्याचेच सिद्ध केले आहे. प्रखरचे दहावीपर्यंतचे शिक्षण बंकटलाल इंग्लिश स्कूलमधून झाले आहे. वडील योगेश अग्रवाल यांचे आयआयटी अभियंता बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. ते प्रखरच्या रुपाने पूर्ण होत असल्याची भावना आई कुसुम यांनी व्यक्त केली. यशात प्रा.एस.जे. तोडकर, शिवम वार्शनेय यांचाही वाटा असल्याचे प्रखर म्हणाला.आदिवासी भागातील महेशला व्हायचंय् कलेक्टर...गुरुवारी लागलेल्या आयआयटी-जेईई अॅडव्हॉन्स्ड परीक्षेच्या निकालात आदिवासी भागातून आलेल्या महेश पोत्तुलवारने २६६ वा रँक मिळविला आहे. अहोरात्र अभ्यास करून मोठे यश संपादन केलेल्या महेशने कलेक्टर व्हायचा मानस व्यक्त केला. नांदेड जिल्ह्यातील काठेवाडी येथील मन्नेरवारलु (एसटी) प्रवर्गात एवढे मोठे यश संपादन केल्याने महेशच्या आई-वडिलांना याचा खूप मोठा अभिमान वाटतो. लातुरातील मिलिंद कनिष्ठ महाविद्यालयात महेशने ११ वी, १२ वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. महेशने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह संस्था सचिव मीनाताई माने व प्रभारी प्राचार्य व्ही.आर. गायकवाड यांना दिले. महेशला पुढे इंजिनिअरिंग करीत युपीएससीची तयारी करायची आहे. दररोज चार ते पाच तास अभ्यासाबरोबर इतर माहितीसाठी वृत्तपत्र वाचनाची आवडही असल्याचे महेशने सांगितले.
‘लातूर पॅटर्न’ची आयआयटीकडे कूच
By admin | Updated: June 20, 2014 00:03 IST