प्रतीक्षा यादी मोठी नागपूर : दिवाळीत आपल्या गावी, शहरात जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना कन्फर्म रेल्वे आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले आहे. अनेक रेल्वेगाड्यांमध्ये मोठी प्रतीक्षा यादी सुरू आहे, तर काही रेल्वेगाड्यांमध्ये रिग्रेड म्हणजेच तिकीट जारी न करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे आरक्षणाच्या आकड्यांवरून ही बाब स्पष्ट दिसून येते. देशातील प्रमुख शहरांसाठी सुरू असलेल्या रेल्वेसंदर्भात रेल्वेच्या अधिकारिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस दुरंतो एक्स्प्रेसमध्ये १५ ते २३ आॅक्टोबरपर्यंत एसी-१, एसी-२, एसी-३ आणि स्लीपर क्लास कन्फर्म आरक्षण तिकीट मिळू शकते. परंतु २४ ते २८ आॅक्टोबरपर्यंत याच रेल्वेतील सर्व क्लासमध्ये आरक्षण तिकिटांसाठीची प्रतीक्षा यादी मोठी आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये २३ आॅक्टोबरपर्यंत सर्व श्रेणीमध्ये आरक्षित तिकीट उपलब्ध आहे. मात्र २४ ते २८ आॅक्टोबरदरम्यान आरक्षण मिळणे कठीण आहे. या कालावधीत आरक्षण तिकिटांसाठीची प्रतीक्षा यादी प्रचंड मोठी आहे.गोंदिया -मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमधये १५, १६, १८ आॅक्टोबरला एसी-१ मध्ये आरक्षण उपलब्ध आहे. परंतु इतर श्रेणीमध्ये प्रतीक्षा यादी मोठी आहे. नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये १५ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत सर्व श्रेणीसाठी प्रवाशांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. याच रेल्वेगाडीत १० आणि ११ नोव्हेंबरसाठी मात्र आरक्षण तिकीट उपलब्ध आहे. नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये १४ ते २१ आॅक्टोबरपर्यंत कन्फर्म आरक्षण तिकीट उपलब्ध आहे. परंतु त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत तिकीट मिळणे कठीण आहे. जवळपास सर्वच रेल्वेगाड्यांची सारखीच परिस्थिती आहे. ७ नोव्हेंबरनंतर परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) रेल्वेतर्फे विशेष रेल्वेगाड्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागातर्फे विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जयपूर-मदुराई साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १५ नोव्हेंबरपर्यंत आणि मदुराई-जयपूर साप्ताहिक विशेष रेल्वे १८ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येईल. म्हैसूर-वाराणसी- म्हैसूर दरम्यान द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेच्या २४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. पुणे-कामाख्या साप्ताहिक विशेष रेल्वे १३ नोव्हेंबरपर्यंत आणि कामाख्या-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वे १० नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहे. मुंबई-हतिया आणि हतिया-मुंबई विशेष रेल्वेच्या ४-४ फेऱ्या होतील. ही गाडी २१ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येईल. नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान १९ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्यात येईल. नागपूर-पुणे विशेष रेल्वे १५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत आणि पुणे-नागपूर विशेष रेल्वे १६ ते ६ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे.
अखेर मनपात काँग्रेसची बनली फिफ्टी !
By admin | Updated: October 8, 2014 00:52 IST