रविवारी सायंकाळी जायकवाडी जलाशयातील साखळी क्रमांक ८० ते ८५ दरम्यान नजरेस पडतील अशा संख्येने किनाऱ्यावर मृत झालेले मासे दिसून आले. यात वाम, मोठे झिंगे, जलवा, पापलेट, टिलापी, चुचीचे मासे, मुरी वाम, चिंगळ्या आदी माशांचा समावेश होता. दरम्यान, मॉर्निंग वाॅक करणारांसह स्थानिक मच्छिमारांना आयती पर्वणी मिळाल्याने अनेकांनी मासे नेले.
या बाबत स्थानिक मच्छिमार व नगरसेवक बजरंग लिंबोरे, रमेश लिंबोरे, रघुनाथ ईच्छैय्या यांनी धरणातील दूषित पाण्याच्या प्रवाहातून मासे पोहून गेल्यास त्यांना चक्कर येते व ते अत्यवस्थ होतात. या दुर्घटनेतून सावरण्यासाठी मासे पाण्याच्या बाहेर येऊन बसतात व जवळपास अर्ध्या तासानंतर ते पुन्हा पूर्ववत अवस्थेत येतात व पाण्यात निघून जातात असे सांगितले.
चौकट
दूषित शेवाळाचा थर साचत असल्याचा परिणाम
जायकवाडी धरणात औरंगाबाद शहर व औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी येत आहे. यामुळे धरणातील पाण्याचे ऑक्ट्रा फिकेशन वाढून धरणात दूषित शेवाळाचा थर वाढत असल्याने मासे मृत होत असल्याचे पक्षिमित्र प्रा. संतोष गव्हाणे यांनी सांगितले. जलाशयात हिरव्या शेवाळाचा थर वाढला असून पाण्यात माशांना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने कदाचित मासे बाहेर आले असावेत, असे अनिल लिंबोरे, विष्णू पंडूरे यांनी सांगितले. धरणातील पाण्यावर पिण्यासाठी लाखो लोक अवलंबून असल्याने पाण्याची शुद्धता तपासण्याची गरज समोर आली आहे.
फोटो : नाथसागर जलाशयात मरण पावलेले मासे.
170521\img_20210517_195157.jpg
जलाशयात मरण पावलेले मासे.