जालना : भूसंपादन कायदा हा शेतकऱ्यांसाठी जाचक नसून कायदा न समजून घेता, त्याचा अपप्रचार विरोधक करीत असल्याची टीका जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. रविवारी लोणीकर हे परतूर येथे भाजपा सदस्य नोंदणी आढावा बैठकीत बोलत होते. लोणीकर पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी फार मोठे भूखंड लागत नसून ५ ते १० एकर जागेवर या शैक्षणिक संस्था सुरू होऊ शकतात. या माध्यमातून ग्रामीण भागातील तरूणांचे भले होणार आहे. तसेच रेल्वेचे जाळे सर्वत्र निर्माण करण्यासाठी जमिनीची गरज पडणार आहे. भारताला प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी आणि ग्रामीण शेतकऱ्यांच्या विकासासाठी भूसंपादन कायदा अपायकारक नसून उपायकारक असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले. गेल्या साठ वर्षात काँग्रेस सरकारने मोठमोठे भूखंड संपादित केले. शेतकऱ्यांकडून या जमिनी कमी भावाने खरेदी केल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार दिलेल्या मोबदल्याच्या चौपट रक्कम शेतकऱ्यांना देणार असून संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देणार असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात पाच हजार गावांना टंचाईमुक्त करण्याचा पहिल्या टप्प्यात आपण विडा उचलला असून तो पूर्णत्वास नेण्यास आपण कार्यमग्न असल्याचे ते म्हणाले. परतूर, मंठा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीत चांगली कामगिरी केल्याने आपण समाधानी असून पहिल्या टप्प्यात येत्या ८ दिवसात सदस्यता नोंदणी पन्नास हजारांच्या पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन लोणीकर यांनी केले. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, मदनलाल सिंगी, रंगनाथ रेंगे, सुधाकर बेरगुडे, दारासिंग चव्हाण यांच्यासह परतूर, मंठा येथील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भूसंपादन कायद्याचा विरोधकांकडून अपप्रचार - लोणीकर
By admin | Updated: March 16, 2015 00:46 IST